II शिक्षक दिन II - लेख

Started by Atul Kaviraje, September 05, 2021, 11:44:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II शिक्षक दिन II
                                           लेख
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज रविवार दिनांक-०५.०९.२०२१, आजच्या दिवसाचे महत्त्व या विषया अंतर्गत, जाणून घेऊया आजचा दिवस. मित्रानो, आज आहे राष्ट्रीय शिक्षक दिन. तर वाचूया, काही माहितीपूर्ण लेख, या दिवसाचे महत्त्व, शुभ संदेश, कविता, भाषण, निबंध आणि इतर माहिती.


     September 05-National Teacher's Day ('शिक्षक दिन')
     ---------------------------------------------------------

     To commemorate the birth anniversary of Dr. Sarvepalli Radhakrishnan and to give tribute to the contributions made by the teachers to the society. International day of charity   To mark the death anniversary of Mother Teresa and to promote charitable efforts made to alleviate poverty across the world.


                   'शिक्षक' भावी पिढीचा शिल्पकार...

     भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....

     डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राम्हन कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची सार्‍या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

     शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

     शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.

     आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


                      (संकलक साभार आणि सौजन्य-संदीप पारोळेकर)

                                 (संदर्भ-मराठी .वेबदुनिया .कॉम)
                    -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2021-रविवार.