‘कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता’ - "घनाभिनंदन"

Started by Atul Kaviraje, September 07, 2021, 12:26:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सत्ताविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "चंद्रशेखर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "घनाभिनंदन"


                                   कविता पुष्प-सत्ताविसावे
                                       "घनाभिनंदन"
                                  ----------------------

घनाभिनंदन--

'कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता'मध्ये आज कवी चंद्रशेखर यांची घनाभिनंदन ही कविता...


(शिखरिणी वृत्त)

अहो आला आला! नवजलद हा अंबरपथीं,
बसोनी वायूच्या अतिचपल-वेगोयुत रथीं;
पहा! नानारंगी विकट धनु त्याचें विलसतें,
विजेची ती दोरी फिरफिरुनि झंकार करिते ॥१॥

महानादें त्याच्या सकलहि नभोमंडल कसें,
दणाणोनी गेलें, झडुनि रणवाद्यें रण जसें;
उडे झंझावातें अपरिमित धूली दशदिशा,
तयानें त्या जैशा दिसति करिणी कोपविवशा ॥२॥

घनच्छायायोगें कितितरि चमत्कार घडला,
पहा! कीं सृष्टीचा अवचित जणों नूर फिरला;
पदार्थांची कांती नयनसुभग श्यामल दिसे,
तयांमध्यें कांहीं नवलपरिचा हर्ष विलसे ! ॥३॥

घनाच्या ध्यानानें जग निजपणातें विसरलें,
म्हणोनी तें भासे जलधरसम श्याम बनलें;
निवाराया आला जलद निज संताप म्हणुनी
उडोनी ग्लानी ये सहजचि नवोत्साह भुवनीं. ॥४॥

विचारोनी पाहें जरि तव महौदार्य तरि, तो,
पती भूगोलाचा कृपणहि दरिद्रीच दिसतो;
तुझ्या श्रीमंतीचा किमपि मिळतां अंश नृपती,
जगामध्यें श्रीमान् म्हणुनि बहु डौलें मिरवती ! ॥५॥

धनाची धान्याची अवनिवरि होणें विपुलता,
तसें सर्वांभूतीं कुशलहि निजोद्योगवशता;
मन:शांती, राष्ट्रोन्नति, सुख, समाधानहि जनीं,
कृपेचीं हीं तूझ्या विलसति फलें भव्य भुवनीं ॥६॥

कृपा जेथें तूझी विलसत असे श्री जणुं तिथें,
न ती जेथें ऐसें स्थल दहनभूमीच गमतें;
असे ह्याचा घेणें अनुभवच कोणासहि जरी,
विलोकावी तेणें तरि भरतभू ह्या अवसरीं ॥७॥

असो पाषाणानें हृदय मग त्याचें बनविलें,
स्थिती ही पाहोनी फुटतिल तया पाझर भले;
तुझ्या ऐसे मेघा असति जन जे आर्द्रहृदयी,
तयांतें येईल द्रव मग न कां ह्याहि समयीं ? ॥८॥

क्षुधेंने तृष्णेनें कळवळुनियां कर्षक किती,
परागंदा झाले त्यजुनि वतनें आणि घरटीं;
किती खेडीं गांवें विजन बनुनी तेविं दिसती,
जशीं चैतन्याच्या विरहित शरीरेंच नुसतीं ! ॥९॥

किती अल्पें मोलें दिनभरि महाकष्ट करिती,
कदान्नानें तेव्हां किमपि जठराग्नी शमविती;
कितेकांहीं कांहीं तरि उदरगर्तेंत भरुनी,
युगाऐसे नेले दिवस नयनीं प्राण धरुनी ! ॥१०॥

(पृथ्वी वृत्त)

कदा नव जलें तुझीं वरसतील पृथ्वीप्रती?
कदा नद-नद्यांतुनी उचमळोनि तीं धावती?
कदा तरि वनस्थली चमकतील पाचेपरी?
जलार्द्र पवनें कदा डुलति रे तरू वल्लरी ? ॥११॥

                         कवी - चंद्रशेखर
                       ------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2021-मंगळवार.