‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी"

Started by Atul Kaviraje, September 09, 2021, 12:34:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया.कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे एकोणतिसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "वसंत सावंत" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी"


                                    कविता पुष्प-एकोणतिसावे
                          "हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी"
                           --------------------------------------

                     
'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज कवी वसंत सावंत यांची 'श्रीरंग' ही कविता...

दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग,
उधळित पिंजर तरल धुक्याची...झाडांवरती रंग.

सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझरतो पाऊस,
किरणांच्या छायेत अनामिक कलाबतूंचे भास.

उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनी,
सह्याद्रीला कुणी फाशिले भस्म नवे शैवांनी.

हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी,
तृप्तीच्या पंखात पोपटी तृणपात्यांच्या राशी.

सारणीच्या पाण्यात रंगली जळस्वप्नांचीं गाणी,
ही सृष्टीची हिरवी गौळण भरली कटिखांद्यांनी.

दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग,
उधळित पिंजर तरल धुक्याची...झाडांवरती रंग.

                            कवी - वसंत सावंत
                          -------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया.कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2021-गुरुवार.