II गौरी-गणपती शुभेच्छा II - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 03:35:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II  गौरी-गणपती शुभेच्छा II
                                          लेख क्रमांक-2
                               ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक- १२.०९.२०२१-रविवार रोजी गौरी चे आगमन होत आहे, दिनांक-१३.०९.२०२१-सोमवार रोजी तिचे साग्रसंगीत पूजन होऊन, दिनांक-१४.०९.२०२१-मंगळवार रोजी, गणेश मूर्ती सह तिचे विसर्जन होणार आहे. मराठी कवितेच्या सर्व कवी आणि कवयित्री, बंधू-भगिनींस गौरी-गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊया, गौरी पूजन, गौरी गणपती उपवास स्वरूप ,गौरी गणपतीचा इतिहास,गौरी गणपतीचे महत्त्व,गौरी घालण्याचे वेगवेगळे मार्ग , व्रत कथा, पूजा विधी, कविता आणि बरंच काही.

                  ...जाणून घ्या गौरी आवाहनाची परंपरा-----

     गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. यावेळी...
गौरी आली, सोन्याच्या पावली...
गौरी आली, चांदीच्या पावली...
गौरी आली, गाई वासराच्या पावली...
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली...
असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

     ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.

     ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.
काहीजणांकडे गौरीसोबतच गणपतीचे विसर्जन होते. तर काहींकडे गौरींचे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे गौरी आणि गणपतीची भेट होतच नाही असेही म्हटले जाते. अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो. मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा उत्सव ही मराठी संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे, असे म्हणता येईल.


                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता .कॉम)
                     ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.