II ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 04:24:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                         लेख क्रमांक-2
                          ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस ऋषिपंचमी म्हणून साजरा केला जातो. यंदा ऋषिपंचमी शनिवारी- ११ सप्टेंबर रोजी येत आहे. जाणून घेऊया, या दिवसाचे महत्त्व, माहिती, कथा, व्रत, आणि बरंच काही.

     ऋषिपंचमी २०२1: ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रिया सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात. यात पूजेनंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते.थोडं पण कामाचं जाणून घ्या या वर्षी कधी साजरी होणार आहे ऋषिपंचमीका साजरी करण्यात येते ऋषिपंचमी आणि स्त्रियांसाठी काय आहे या दिवसाचे महत्व जाणून घ्या.

                   ऋषिपंचमीच्या व्रताची कथा आणि पूजेची पद्धत-----

     ऋषिपंचमीचा सण (Rishi Panchami) यावर्षी ११ सप्टेंबर - शनिवार  रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरतालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते.

     या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. शास्त्रातील मान्यतांनुसार ऋषिपंचमीचे व्रत शुद्ध मनाने केल्यास सर्व दुःखे दूर होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते. जाणून घ्या याचे महत्व, कथा आणि पूजेचे विधी.

                           ऋषिपंचमीचे महत्व:-----

     ऋषिपंचमीचा दिवस व्रत ठेवण्यासाठी फलदायक असतो. पौराणिक मान्यतांच्या अनुसार ऋषिपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्यास त्यांना सुख-शांती आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या दिवशी गंगास्नानाचेही महत्व असते. महिला यादिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती आणि समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते आणि पंडितांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करण्यात येते. अविवाहित स्त्रियांसाठीही हे व्रत महत्वपूर्ण आणि फलदायी मानले जाते.

                     ऋषिपंचमीच्या पूजेची पद्धत:-----

     ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी स्नान करावे.
यानंतर मंदिरात एक चौकोन करून सप्तऋषींच्या प्रतिमा तयार कराव्यात.
त्यावर कलश ठेवावा. तूप, धूप, दिवा लावून फळफळावळांचा नैवेद्य दाखवावा.
या दिवशी स्त्रियांनी धान्यसेवन करू नये.
उद्यापनानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे.

                    ऋषिपंचमीच्या व्रताची कथा:-----

     फार पूर्वी विदर्भ नावाचा एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहात असे. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी होती. ब्राह्मणाने आपल्या मुलीचा विवाह एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात केला, परंतु दुर्दैवाने त्याच्या जावयाचा अकाली मृत्यू झाला. ज्यानंतर त्याची विधवा मुलगी तिच्या माहेरी येऊन राहू लागली. एके दिवशी मध्यरात्री तिच्या शरीरात किडे पडू लागले. यामुळे ब्राह्मण तिला घेऊन एका ऋषीकडे गेला.

     ऋषीने सांगितले की ब्राह्मणाची मुलगी गेल्या जन्मी ब्राह्मणी होती आणि एकदा ती रजस्वला असूनही तिने घरात काम केले आणि भांड्यांना हात लावला, ज्यामुळे तिच्या शरीरात किडे पडत आहेत. शास्त्रांनी रजस्वला स्त्रीला काम करण्यास बंदी घातली आहे, पण ब्राह्मणाच्या मुलीने याचे पालन केले नाही ज्याची शिक्षा तिला या जन्मी मिळते आहे. ऋषीने पुढे सांगितले की जर ब्राह्मणाच्या मुलीने श्रद्धेने ऋषिपंचमीचे व्रत केले आणि देवाची क्षमा मागितली तर तिला मागच्या जन्मीच्या तिच्या पापांपासून मुक्ती मिळेल. मुलीने ऋषीच्या सांगण्यानुसार साग्रसंगीत पूजा आणि व्रत केले, ज्यानंतर तिच्यावर कृपा झाली आणि मागच्या जन्मीच्या तिच्या पापांपासून मुक्ती मिळाली. याप्रकारे ऋषिपंचमीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                   -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.