"मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी"-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 11:06:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                             "मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी"
                                       (लेख क्रमांक-१)
                           ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      "मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी", या लेख-मालिकेतील, आज आपण (लेख क्रमांक-१) वाचूया. यात "मला सांगायचं आहे" अंतर्गत, "नाव, भाषा आणि धर्म", या विषयावर एक लेख.

नाव, भाषा आणि धर्म-----

     भाषा आणि धर्म म्हणजे जणू दोन समांतर रेषा होय. कोणत्याही भाषेचा विचार  कोणाच्या धर्माच्या दृष्टीकोनातून करू नये. तथापि काही बाबतीत असे आढळून येते, की धर्मावरून एखाद्या व्यक्तीचे नाव निश्चित केले जाते. उदाहरण द्यायचे झाले तर आन्गलो-इंडियन व्यक्ती या ख्रिस्ती धर्मीय असतात. हे लोक आपला मूळ वंश  युरोपात असल्याचा  दावा करतात. ते आपापली नावे इंग्लिश ठेवण्यात अभिमान बाळगतात, जॉर्ज, पीटर, ह्यारी, डिक इत्यादी. त्यातही काही भारतीय ख्रिस्ती अपवाद  आहेत. श्री.  हरेंद्र प्रसाद मुखर्जी, बंगालचे  माजी राज्यपाल हे ख्रिस्ती होते. त्यांच्या  नावावरून  ते ख्रिस्ती  आहेत  हे समजत  नसे.  प्रीतीश नंदी हेही असेच आहेत. ते ख्रिस्ती आहेत. त्यांचे हे नाव अनेक बंगाली हिंदुंच्यासारखे आहे.

     बंगाली मुस्लिमांची नावे अरबी भाषेवरून ठेवली जातात. तथापि काझी नझरूल इस्लाम यांच्या मुलांची नावे आहेत, सव्यसाची ( सब्यसाची ) आणि अनिरुद्ध. अर्थातच विक्टर बानर्जी आणि क्रोम्पटन दत्ता हे आणखी असे अपवाद आहेत. येथे मला जे सांगायचे आहे, ते म्हणजे भाषेचे  धर्माशी काहीही देणेघेणे नसते. जी भाषा समृद्ध आणि मधुर असते, तिचा बहुसंख्य लोक स्वीकार करतात. अहो, अनेक जर्मन शास्त्रद्न्य हे संस्कृत भाषा जाणणारे होते. होसेनुर रहमान (Hosainur Rahman) हे नेहमी संस्कृत वेदांचा उल्लेख करतात. उर्दू ही देखील एक मधुर आणि समृद्ध भाषा आहे. आणि म्हणून उर्दुचा विकास करण्याच्या चळवळीच्या संबंधात  कोणी मनात पूर्वग्रह  ठेवू नये.

     बंगाली असे आपल्या मुलांच्या नावांच्या बाबतीत प्रयोग करण्यात भारतात पुढे असतील, यात शंकाच नको. जगातील अन्य भाषिक समाज या क्षेत्रात एवढे रस दाखवत नसतील. परंतु हे सारे सुरू झाले ते गुरुदेव रवींद्रनाथ यांच्यापासून. अनेक आई वडील आपल्या मुलांची नावे सुचवण्यासाठी त्यांना विनंती करायचे. त्यातून नाविन्यपूर्ण नावे एकामागून एक आली –  अमर्त्य, पुण्यश्लोक, अजेय हे त्यापैकी काही नमुने.त्या पूर्वी इंग्रजी शिकलेले काही नेटिव्ह भारतीय  आपल्या  मुलांची नावे ठेवत असत – डॉली, डोरा, जॉर्ज आणि केव्हा केव्हा लॉर्ड  असेही ! रवींद्रनाथांच्यानंतर लोक पौराणिक आणि महाकाव्यातील  नावांचा  शोध  घेऊ लागले. उदा.  मेघनाद !

     धार्मिक वा प्रांतीय सीमा ओलांडून आयेशा, शिरीन, सिराज अशी नावेही हिंदू घराघरात आली. व्हिक्टर किंवा कॉम्पटन या बरोबर तनया, गोपोल, पुश्किन इत्यादी नावे सर्वसाधारणपणे दिसू लागली. अजूनही असे प्रयोग चालू आहेत. यातूनच बंगाली जगातील इतर लोकांच्या मध्ये  वेगळे दिसतात, नाही का ?

[ दी स्टेटसमनमधील  मोहम्मद मायकेल मुखर्जी, बेलफार, ओडिशा आणि सुचेता घोष, कोलकाता   यांच्या  दोन पत्रांतून व्यक्त झालेले विचार वर उद्घृत केले आहेत. रोजच्या वृत्तपत्रातील  पत्रांचा  कोपरा आपण कधी चुकवतो का ? त्यात नेहमीच तक्रारी, गा-हाणी असतात असे नव्हे. कदाचित प्रदीर्घ लेखाहून  अशी  पत्रे   आपल्या विचारांना  चालना देणारी  असतात.  आपल्याला  काय  वाटते ? ]

लेख दिनांक- फेब्रुवारी 29, 2012.
-------------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मैत्री २०१२.वर्डप्रेस.कॉम)
                  -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.