"मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी"-(लेख क्रमांक-2)

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 05:41:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी"
                                       (लेख क्रमांक-2)
                          ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      "मैत्री २०१२-आपली सर्वांची अनुदिनी", या लेख-मालिकेतील, आज आपण (लेख क्रमांक-2) वाचूया.  यात भाई कर्णिक यांच्या  ' गोंय माज्या मनातले ' या 'अंतर्नाद' मासिकाच्या जुलै २००० च्या अंकातील एक लेख नमूद केला आहे.

     आता २०११ मध्ये ही कादंबरी दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने पुन्हा नव्याने वाचताना एक प्रश्न पडला, की  माननीय यशंवत कर्णिक यांना या  कादंबरीची प्रेरणा  गोमंतक स्वातंत्र्य आंदोलनातील कोणत्या क्रान्तीवीराकडून मिळाली असेल बरे ? आणि याचे उत्तर भाई कर्णिक यांच्या  ' गोंय माज्या मनातले ' या 'अंतर्नाद' मासिकाच्या जुलै २००० च्या अंकातील लेखात सापडले. त्यातील महत्वाचा व संदर्भ असलेला  भाग खाली देत आहोत.

     गोवा मुक्तीच्या चार-पाच दिवस अगोदर  मी वृत्तपत्रात वाचलं होतं, की सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक हृदयनाथ सरदेसाई हे पोर्तुगीज सैनिकांनी केलेल्या  गोळीबारात  गंभीर जखमी झाले आहेत. हृदयनाथ हे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे चुलतबंधू.  १९ डिसेंबर  १९६१ रोजी भारतीय फौजा गोव्यात शिरल्यावर सैनिकी अधिका-यांनी सरदेसाईन्चा शोध घेतला, तेव्हा ते रायबंदर येथील सरकारी रुग्णालयात मरणोन्मुख स्थितीत पडलेले त्यांना आढळले. ले. ज. के.पी. क्यांडेथ यांनी त्यांना ताबडतोब हेलीकॉप्टरने  पुणे येथील मिलिटरी इस्पितळात हलवलं.

     उपचारानंतर सरदेसाई गोव्याला परतले. यानंतर काही वर्षे गेली. १९७३ साली माझी 'निळा डोह' ही गोवा स्वातंत्र्य संग्रामावरील कादंबरी प्रकाशित झाली. स्थानिक महाराष्ट्र परिचय केंद्राने एक चर्चा दै. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चा आयोजित केली होती. चर्चेच्या वेळी मला कुणीतरी विचारलं, " निळा डोह तुम्ही सुप्रसिद्ध स्वातंत्र सेनानी मोहन रानडे यांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलीत का ? " मी म्हणालो, " कादन्बरीचा नायक मी, मोहन रानडेन्ना नव्हे तर हृदयनाथ सरदेसाईना डोळ्यांसमोर ठेऊन रंगवला आहे."

     आणखी काही वर्षे गेली. साधारण १९८१ च्या सुमारास मी पणजी येथे रस्त्याने चाललो असता अचानक मला सरदेसाई भेटले. त्यांची दाढी वाढली होती, डोळे खोल गेले होते, कपडे मळले होते. त्यांनी आवेगाने माझा हात हातात घेतला व ते म्हणाले, " कर्णिक, माझी नोकरी गेली. मी खूप संकटात आहे. स्वातंत्र्यलढ्यात अगदी तरुण वयात पडलो, शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही. मला दयाळू सरकारनं रेशनिंग खात्यात टेंपररी क्लार्कची नोकरी दिली  होती. आता  रेशनिंग खातंच त्यांनी बंद करून टाकलंय. " मी म्हणालो, " गोवा मुक्त करण्यासाठी त्यांना तुम्ही हवे होतात. तुमच्यामुळे ही माणसं अधिकारावर  आली. आता  त्यांना तुमची गरज वाटत नाही. स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणारे बांदोडकरही गेले आणि निवडणूकीत त्यांचा पक्ष हरलाय. दिवस कठीण आलेत. "
सरदेसाई  म्हणाले की राज्यपालांना विनंती करून आपल्याला दुस-या कुठल्याही नोकरीत सामावून घेता येईल का पाहावं. मी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला व तो त्यावेळचे ना. राज्यपाल जगमोहन यांच्यासमोर ठेवला. वास्तविक ते फार सहृदय गृहस्थ, गोव्याच्या इतिहासाचे अभ्यासक. पण का कोण जाणे, त्यांनी सरदेसाईन्चा अर्ज " विचारार्थ " एवढाच शेरा मारून मुख्य सचिवांकडे पाठवला. तो सचिवालयाच्या धुळीनं माखलेल्या फाईल्समध्ये जाऊन  लुप्त  झाला.

     आणखी काही काळ गेला. १९८६ मध्ये निवृत्त व्हायच्या सुमारास मी वर्तमानपत्रात वाचलं, की हृदयनाथ सरदेसाई यांच्या डोक्यावर परिणाम होऊन ते घरातून नाहीसे झाले आहेत. मी अतिशय अस्वस्थ झालो. माझ्या कादन्बरीचा नायकच हरवला होता. मी ते वृत्तपत्रातील  कात्रण काढून हृदयनाथ सरदेसाईन्च्या अतुलनीय त्यागावर एक विस्तृत नोट तयार केली व स्वतः ना.राज्यपाल डॉ. गोपाल सिंग यांच्याकडे घेऊन गेलो. डॉ. गोपाल सिंग हे फार संवेदनाशील गृहस्थ, गाढे व्यासंगी व सृजनशील लेखक होते. त्यांनी ताबडतोब पोलीस प्रमुखांना हुकूम केला, की सरदेसाईन्ना शोधून काढून उपचारार्थ इस्पितळात  दाखल करा.

     मी त्यानंतर निवृत्त होऊन काही दिवस मुंबईला येऊन राहिलो. गोव्यात परत गेल्यानंतर मला वृत्तपत्रातून कळलं, की हृदयनाथ सरदेसाई यांचं अत्यंत  विपन्नावस्थेत निधन झालं. त्यांच्यामागे पत्नी व मुलं आहेत. एका थोर क्रान्तिकारकाचा अशा प्रकारे दुःखद शेवट व्हावा ही गोष्ट माझ्या मनाला फार लागून राहिली.  अजूनही त्यांची आठवण झाली, की माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. शेक्स्पीरीयन त्र्याजेडी म्हणतात ती याहून आणखी काय वेगळी असते ?


-----श्री. ग.ना. कापडी
      -----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मैत्री २०१२.वर्डप्रेस.कॉम)
                 -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.