" लेख " - "हल्ली सगळं बदलतय"

Started by Atul Kaviraje, September 18, 2021, 12:05:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            " लेख "
                                           ---------
   
मित्र/मैत्रिणींनो,

     "लहानपणीची शाळा " या विषयावर एक सुंदर लेख वाचूया, आणि  या लेखातील आशय समजून घेऊया. या लेखाचे शीर्षक आहे- "हल्ली सगळं बदलतय"


हल्ली सगळं बदलतय--------


     आज सकाळी शाळेत जाणारी मुलं बघितली. इवलुशी. पाठीवर भली मोठी बॅग , त्यात एक लिटर पाण्याची बाटली . त्याच्या आकारापेक्षा बॅगचा आकारच मोठा दिसत होता . थांबून विचारलं बाळ कितविला रे?  "जुनियर केजी"  मनात आलं विचाराव, जुनियर केजी काय प्रकार आहे पण  स्वत:ला थांबवलं, अचानक पाऊस सुरू झाला आणि आडोशाला आलो. फेब्रुवारी महिना आणि पाऊस ! मला हसु आलं. हल्ली पावसाळा सोडून कधीही पाऊस पडतो, कलियुग आहे ना.

     लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे फक्त पाटी पेन्सिल होती. काहींकडे खापराची पाटी . त्यावर लिहताना हाताला मऊ मऊ वाचायचं आणि अक्षरही ठळक दिसायचे. खापराची पाटी फार जपून वापरावी लागे कारण थोडी जरी पडली की लगेच फुटायची . मग नाईलाजाने  पुट्याची पाटी वापरावी लागे . पाटीवर पाटपोट लिहण्यात एक वेगळीच गंमत होती . हळूहळू  पुढच्या इयत्तेत जाताना आमच्याकडे दप्तर आलं. त्यात एक-दोन पुस्तकं आणि पाटी. पुढे यात वही-शिसपेन्सिल-खोडरबर-पेन याची भर पडली. काहींच दप्तर म्हणजे वायरची पिशवी !

     शाळा सुटली की आम्ही मित्र मनसोक्त खेळायचो बॅट-बॉल  (क्रिकेट) , शिवनापाणी, रात्र होईपर्यंत हुन्दडायचो, जाम भुक लागायची, गिळलं की झोपायचो. होमवर्क नावाचा प्रकार माहीत नव्हता, कधी-कधी  रात्री आजी गोष्टी सांगायची,  फार मजा यायची. शाळेत लघवीच्या सुट्टीत आईकडून पैसे घेऊन चिक्की , बुढ्ढीके बाल खायचो .

     पावसाळ्यात चिक्कार धो-धो पाऊस पडायचा . पत्र्याचे वर्ग गळायचे, वर्गात पाणी साठायचं. मग सुट्टी ! गुरूजींनी सुट्टी सांगितली की आम्ही आनंदाच्या भरात पावसातच घरी निघायचो. घरी जाईपर्यंत पुर्ण भिजायचो. कधी-कधी सकाळीच रिमझिम पाऊस सुरू व्हायचा मग आज शाळेला सुट्टी मिळणार असं वाटून खुष व्हायचो, पण मग आई कोप-यात अडगळीला पडलेली छत्री हातात देऊन शाळेचा रस्ता दाखवायची . मी छत्री घेऊन निघालेलो बघून माझा मित्र देखील छत्रीत यायचा मग दोघंही खांदे भिजवत शाळेत जायचो . वाटेत एखाद्या पन्हाळ्याखाली मुद्दाम छत्री घेऊन उभे रहायचो . वेगळीच मज्जा यायची. पाण्यात खड्याचा अंदाज न आल्याने पाय बुडून खाकी चड्डी भिजायची. नदीला पुर आला की तो बघायला आम्ही सगळे घोळका करून जायचो आणि वेशीतल्या मारुती मंदीराच्या कट्ट्यावरून पुर बघायचो. पाऊस भरपूर व्हायचा नदीला बारमही पाणी असायचं, दस-यापुर्वी  कपडे धुण्यासाठी सर्व लोक नदीवर यायचे. आई कपडे धुवायची आणि आम्ही भावंड वाळूत पाण्यात मनसोक्त खेळायचो.

     पण हल्ली सगळं बदलतय,  ना पुर्वीसारखा पाऊस पडतो ना नदी वाहते. एखाद्यावर्षी तर पावसाळयात देखील नदीचा घसा कोरडाच असतो. आता शाळा सुटल्यावर मुलांना खाजगी शिकवण्यातुन  खेळायला वेळच मिळत नाही . घरात आजी-आजोबाच नसतील तर त्याच्या गोष्टी कुठून येणार आणि पुरेसा पाऊस जर पडत नाही तर छत्री कशाला लागेल असच चालू राहील तर कदाचित छत्रीच उत्पादन बंद होईल आणि पाटी-पेन्सिल ...? भानावर आलो तेव्हा पाऊस सडा शिंपून गेला होता... चला निघायला हवं.


        लेखक-अभिजीत हजारे.
      -----------------------
             
                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॉलेज कट्टा.कॉम बेस्ट)
                   -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2021-शनिवार.