"विश्व अल्जाइमर दिवस" - लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 21, 2021, 12:56:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "विश्व अल्जाइमर दिवस"
                                         लेख क्रमांक-१
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०९.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस हा "विश्व अल्जाइमर दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

      २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या आहेत. अल्झायमर डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झायमर डिसीजबद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.

     अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झायमर डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.

                      अल्झायमर ची कारणे काय?-----

     आज ह्या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन ११० वर्षे झाली आहेत. पण ह्याचे कारण फक्त ३ शब्दांत म्हणजे - ''नक्की माहीत नाही''

     अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या ज्ञान कौशल्याची शिकस्त करुनही आज ह्या आजारावर नक्की इलाज सापडलेला नाही ही बाब खरी आहे. मुळात कारणच माहित नाही तर उपचार करणार तरी कुठल्या आधारावर? ह्या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री पण विशेष उपयोगी पडत नाही. मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्याची वेळ आली तरच त्याचा उलगडा होतो.

       

                   (साभार आणि सौजन्य-डॉ. संतोष जळूकर)
                           (संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2021-मंगळवार.