"विश्व अल्जाइमर दिवस" - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 21, 2021, 12:59:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "विश्व अल्जाइमर दिवस"
                                         लेख क्रमांक-2
                                  ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०९.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस हा "विश्व अल्जाइमर दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

                       अल्झायमर होऊ नये म्हणून :-----

     अल्झायमर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयी बरेच काही वाचायला मिळते. त्यात ''नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. वास्तविक हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात, अल्झायमर होऊ नये म्हणून विशेष असे ह्यात काहीही दिसत नाही. नाही म्हणायला डोनपझिल आणि रिव्हास्टिगमिन नावाची दोन औषधे आहेत. शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे होतात. शिवाय इतर औषधांच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतात. हे उपचार रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी आहेत एवढे लक्षात ठेवले पाहिजे. थोडक्यात म्हणजे अल्झायमर डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आजतागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही. पण शास्त्रज्ञांनी ह्या विषयावर जो काही अभ्यास केला आहे त्यावर आधारित काही आयुर्वेदिक तत्वांचा आणि उपचारांचा असा एक वेगळी दिशा दाखवणारा प्रामणिक प्रयत्न आपण करू शकतो.

                           मेंदूचा विचार :-----

     मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये ७० टक्के वाटा स्निग्ध पदार्थांचा आहे आणि ३० टक्के वाटा प्रथिनांचा आहे. म्हणजेच मेंदू हा मुख्यतः स्निग्ध पदार्थांनी घडलेला भाग आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार चार प्रमुख स्निग्ध पदार्थ असतात ते - ''घृत-तैल-वसा-मज्जा'' अर्थात – तूप, तेल, चरबी आणि मज्जा म्हणजेच मेंदू किंवा हाडांमधली चरबी. त्यातील रासायनिक घटकांबद्दल सूक्ष्म विश्लेषण आयुर्वेदात दिले नसले तरी त्यांच्या गुणधर्मांबद्दल सखोल माहिती उपलब्ध आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आयुर्वेदात जे उपाय सांगितले आहेत त्यांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. गाईच्या तुपाबद्दल आयुर्वेदात केलेले वर्णन –

     ''शस्तं धीस्मृतिमेधाग्निबलायुः शुक्रचक्षुषाम् । बालवृद्धप्रजाकान्तिसौकुमार्यस्वरार्थिनाम् ॥ क्षतक्षीणपरीसर्पशस्त्राग्निग्लपितात्मनाम् । वातपित्तविषोन्मादशोषालक्ष्मीज्वरापहम् ॥ स्नेहानामुत्तमं शीतं वयसःस्थापनं घृतम्।''...

     म्हणजेच गायीचं तूप हे मेंदूच्या तीन क्रिया, 'ज्ञान ग्रहण करणं, ते योग्य प्रकारे साठवून ठेवणं आणि वेळेवर स्मरण होणं ह्यासाठी श्रेष्ठ आहे. ह्याने भूक सुधारते, शारीरिक शक्ती वाढते, प्रजनन क्षमता सुधारते . . . . असे अनेक गुण ह्यात आहेत. श्लोकातील शेवटच्या ओळीचा अर्थ – सर्वप्रकारच्या स्निग्ध पदार्थांपैकी गाईचे तूप श्रेष्ठ आहे, हे स्वभावाने थंड असून वयस्थापन म्हणजे वयानुसार होणारी लक्षणे रोखण्याची किमया ह्यात आहे.

                   (साभार आणि सौजन्य-डॉ. संतोष जळूकर)
                           (संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2021-मंगळवार.