‘जागतिक नदी दिन’ - लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 03:42:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       'जागतिक नदी दिन'   
                                          लेख क्रमांक-4
                                     ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५ .०९ .२०२१ -शनिवार  आहे. आजचा दिवस हा "जागतिक नदी दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

     आज जागतिक नदी दिवस:नदीमुळे जगण्यातलं कोरडवाहूपण जातं अन् आयुष्यात समृद्धी, भरभराट येते

     जीवन समृद्ध करणारी नदी व तिच्या संवर्धनाबद्दल मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांची मते-----

     नद्यांचे अस्तित्व आज धोक्यात आलं. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही होत आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे नदी व पर्यावरण संवर्धनात जनसामान्यांना जोडून अविरतपणे काम करत आहेत. जगभरात सप्टेंबर महिन्यातील चौथा रविवार "जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जीवन समृद्ध करणारी नदी व तिच्या संवर्धनाबद्दल त्यांची मते....

               नदीला स्वच्छ ठेवण्याची शपथ सर्वांनीच घ्यावी : मकरंद अनासपुरे-----

     नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताना राज्यात आजवर ४० पेक्षा अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन केले. नदीला जपले तरच मानवाच्या जगण्यातील कोरडवाहूपण जाईल आणि समृद्धी आपोआप येईल. जी नदी आपणाला समृद्धी देते तिला घाण न करता तिची आपल्या परीने काळजी घ्यायला हवी. जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने नदीचे पूर्ण पावित्र्य जपत ती कधीही घाण करणार नाही अथवा त्यात प्लास्टिक, कचरा टाकणार नाही, ही शपथ सर्वांनीच घ्यावी.

     नदीचे पुनरुज्जीवन झाले तर कशी किमया घडू शकते हे जालना जिल्ह्यातील भोरडी नदीच्या उदाहरणावरून कळते. नाना पाटेकर यांच्या साथीने आम्ही जेव्हा येथे नदी खोलीकरणाचे काम केले तेव्हा कोरडवाहू पट्टा बागायतीत बदलून गेला. आज शेतकरी चार पिके घेत आहेत.

            नद्या या तर शरीरातील धमन्यांप्रमाणे, त्यांना जपा : सयाजी शिंदे-----

     शीर कापली तर हृदय बंद पडून मृत्यू व्हायला वेळ लागत नाही अगदी त्याच पद्धतीने आपण नद्यांवरचं अतिक्रमण थांबवून पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले नाहीत तर मानवी जीवनच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निर्माल्य आणि कारखान्यातून जाणारे केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने आज प्रचंड नुकसान होत आहे. कारखानदारांवर कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याने ही स्थिती उद‌्भवली. नदी वाचवण्यासाठी आज त्यांचा नैसर्गिक प्रवाह वाहू दिला पाहिजे. मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांची मानसिकताच अतिशय खराब अशी आहे. पर्यावरण, जलसंधारणासाठी मी व माझे ८-१० सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील शहीद जवानांच्या नावाने वृक्ष लावणार आहे.

शब्दांकन : नितीन पोटलाशेरू.
----------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-दिव्यमराठी .भास्कर .कॉम)
                  --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.