"नवरात्रोत्सव"-दिवस दुसरा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 08, 2021, 01:48:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                          दिवस दुसरा
                                           रंग  हिरवा
                                          लेख क्रमांक-2
                                      ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -०८ .१० .२०२१ -शुक्रवार ,नवरात्रीचा दुसरा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, घटस्थापनेपासून  सर्व  दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, मंत्र, पूजेचे साहित्य, भारूड , गोंधळ , जोगवा आणि इतर माहिती. (आजच्या दिवसाचा रंग  हिरवा आहे.)

     मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- " शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)

     नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

                       जोगवा मागणारी महिला----

     जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.

    परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-

अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥

     या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.

     नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.

                              देवीचा गोंधळ----

     शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे.

     देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.

                      ललिता पंचमी----

     आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.

     हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. दुर्गानवमी :- आश्विन शुद्ध नवमीसच हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.


                        (संदर्भ-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
                        (साभार आणि सौजन्य-विकिपीडियI.ऑर्ग)
                      ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2021-शुक्रवार.