"नवरात्रोत्सव"-दिवस दुसरा-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 08, 2021, 01:50:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                          दिवस दुसरा
                                           रंग  हिरवा
                                         लेख क्रमांक-3
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -०८ .१० .२०२१ -शुक्रवार ,नवरात्रीचा दुसरा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, घटस्थापनेपासून  सर्व  दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, मंत्र, पूजेचे साहित्य, भारूड , गोंधळ , जोगवा आणि इतर माहिती. (आजच्या दिवसाचा रंग  हिरवा आहे.)

                             महाअष्टमी----

     महालक्ष्मीव्रत हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी, अशी या व्रतातली पूजा आहे.

     तांदुळाच्या पिठाचा मुखवटा :- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजल कुंकवाने रेखाटतात.हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात. मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.

     घागरी फुंकणे :-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे.

                   महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)----
                               महानवमी----

     एक तिथीव्रत. आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताचा विधी आहे.

                          विजयादशमी----

     आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे.

     दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे.

      म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.

                      नवरात्रातील नऊ माळा----

     नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.

पहिली माळ--
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ--
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

तिसरी माळ--
निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी माळ--
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ--
बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ--
कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ--
झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ--
तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ--
कुंकुमार्चन करतात.


                       (संदर्भ-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
                       (साभार आणि सौजन्य-विकिपीडियI.ऑर्ग)
                      --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2021-शुक्रवार.