"नवरात्रोत्सव"-दिवस दुसरा-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, October 08, 2021, 01:54:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नवरात्रोत्सव"
                                        दिवस दुसरा
                                         रंग  हिरवा
                                       लेख क्रमांक-5
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -०८ .१० .२०२१ -शुक्रवार ,नवरात्रीचा दुसरा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, घटस्थापनेपासून  सर्व  दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, मंत्र, पूजेचे साहित्य, भारूड , गोंधळ , जोगवा आणि इतर माहिती. (आजच्या दिवसाचा रंग  हिरवा आहे.)

प्रतिपदा--
या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय 'देवीचा उदो' अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके.

द्वितीया--
रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.

तृतीया--
अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे.

चतुर्थी--
सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.

पंचमी--
श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.

षष्ठी--
दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.

सप्‍तमी--
सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.

अष्टमी--
देवीपूजनाचे वेळी 'अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली' असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.

नवमी--
होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण.

दशमी--
अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.

                  पुण्यातील  नवरात्र (२०२१ साल)----

     फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतु:शृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.

     पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :- सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.
एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात. पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.

                        मुलींचा भोंडला----
   
     नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. भोंडला हा बहु उंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

     पुण्यामध्ये या दिवसांत (२०२१ साल) या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.


                        (संदर्भ-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
                        (साभार आणि सौजन्य-विकिपीडियI.ऑर्ग)
                      ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2021-शुक्रवार.