"नवरात्रोत्सव"- दिवस सातवा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 12:53:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नवरात्रोत्सव"
                                         दिवस सातवा
                                           रंग निळा
                                        लेख क्रमांक-१
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१३ .१०.२०२१ -बुधवार , नवरात्रीचा सातवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र जोगवा , भोंडला  आणि  इतर . (आजच्या दिवसाचा रंग निळा  आहे.)

                         उत्सव नवरात्रीचा...

     गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे.

     नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. आपल्या समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं.

     गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. मधला पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो, समजतच नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत निराळी. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. एकुणात नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. त्यासाठी गोंधळी बोलावले जातात. अर्थात यावत तेलम् त्यावत् आख्यायनम् हे आलेच.

     देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. 'या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:' असेच म्हटले जाते. एरवी, 'सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते' अशी तिची प्रार्थना केली जाते.

                                   भोंडला----

     अगदी लहान असताना, पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती, सख्यांसंगे फेर धरून, गाणी म्हणत असू. शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच. नवरात्रीचे नऊ दिवस असा भोंडला घातला जाई. दररोज वेगळी खिरापत, कुणीतरी डबा वाजवून दाखवे म्हणजे आवाजाने ओळखण्याचा प्रयत्न करता येई. प्रत्येक घरी वेगळा पदार्थ असे. काही ठिकाणी पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, अशा चढत्या क्रमाने खिरापती असावयाच्या, दसऱ्याच्या दिवशी मात्र सर्वाकडे दहा खिरापती असावयाच्या. आम्ही श्रीबालाजीची सासू असे म्हणत असू. श्री. श्रीखंड, बा-बासुंदी, ला-लाडू, जि-जिलेबी, ची-चिरोटे किंवा चिवडा, सा-साखरभात आणि सामोसे, सु-सुतरफेणी, यांपैकी काहीही असले तरी, होकार येई आणि ओळखण्याचे काम थांबून जाई. पहिल्या दिवशी, 'ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा', या गाण्याने सुरुवात होई, क्रमाक्रमाने बाकीची गाणी येत आणि शेवटच्या दिवशी, 'आड बाई अडोणी, आडाचे पाणी, काडोणी, आडात पडला शिंपला आणि आमचा भोंडला संपला' असे उच्च रवात ओरडत असू.

      घरामध्ये नवरात्र बसते. अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो, पण रात्री मध्येच उठून घरातील मोठी स्त्री, दिव्यात तेल घालते, वात सारखी करते. हायस्कूलमध्ये असताना मी पुण्यातून मराठवाडय़ात आले आणि पहिल्यांदाच 'अश्विन शुद्ध पक्ष, अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी' ही आरती ऐकली. आरतीचे ध्रुपद आहे, 'उदो बोला उदो बोलो, अंबाबाई माउलीचा हो आनंदे गर्जती, काय वर्णू महिमा तिचा' सर्वजण मिळून आरती म्हणताना, काय वर्णूच्या ऐवजी, 'गाय वर्णू महिमा' असे ऐकू येई आणि गाय वर्णू म्हणजे काय, हे मला उलगडत नसे. जेव्हा ती आरती शांत, स्वस्थ स्वरात ऐकता आली तेव्हा तो शब्द गाय नसून, काय आहे हे लक्षात आले.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                   ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.