"नवरात्रोत्सव"-दिवस सातवा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 12:56:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                          दिवस सातवा
                                            रंग निळा
                                         लेख क्रमांक-2
                                     ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१३ .१०.२०२१ -बुधवार , नवरात्रीचा सातवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र जोगवा , भोंडला  आणि  इतर . (आजच्या दिवसाचा रंग निळा  आहे.)

    नवरात्रीमध्ये जोगवा म्हणून, बायका जोगवाही मागतात. जोगव्याची अनेक गाणी आहेत, पण परभणीला आमच्याकडे शेण देण्यासाठी, हरणाबाई नावाची बाई येत असे सडा, संमार्जनासाठी ती शेण आणून देत असे. काळा कुळकुळीत रंग, पांढरेशुभ्र दात, कपाळावर रुपयाएवढे लाल कुंकू. तिचे प्रसन्न हास्य आजही स्मरणात राहिलेले. नवरात्र सुरू झाले की फाटकातून आत शिरल्या शिरल्या, ती म्हणू लागे,

'आईचा तुळजा, देवही तुळजा,
देवाच्या भगती गोंधुळ घालिती.
खिरी तूप पतरी भरती,
आई बसली नवराती,
दहा दिसांची भरती,
पाटील पांडेया मिळूनी,
गाव लोक या मिळुनी,
शिवलगनाला जाती,
शिवलगनाला जाती,
धानाचे तुरे लेती,
येतील मांगिणी जोगिणी
हाती कुकाचा करंडा,
भांग भरिला मोत्याने,
पतर भरिला तुपाने,'

     आणि शेवटी, 'जोगवा वाढाहो माय' असे ती म्हणत असे. तिचे ते गाणे, तिच्या ग्राम्य भाषेत, तिच्या तोंडून ऐकताना खूप गोड वाटे. आई मग जोगवा म्हणून, धान्य, पीठ तिच्या परडीत घालीत असे.

          शहरी भाषेत जोगव्याचे विविध प्रकार आहेत.---

'अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी,
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लावूनी
त्रिविध तापाची करावया झाडणी,
भक्तालागी तू ऽऽऽ
भक्तालागी तू पावसी निर्वाणी,
ऐसा जोगवा जोगवा मागेन।

द्वैत सारूनी माळ मी घालीन,
हाती बोधाचा झेंडा मी घेईन,
भेदरहित वारिसी जाईन,
ऐसा जोगवा मागेन।

नवविध भक्तीच्या भक्तीच्या करिती
नवरात्री, ओटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा,
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा'

     असा सद्गुणांचा, नि:संग होण्याचा, विकल्प, काम, क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा बायका मागतात. या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. मात्र तो समजून घेऊन, जोगवा मागितल्यास मनशुद्धी होऊन मन:शांती नक्कीच मिळेल.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.