"नवरात्रोत्सव"-दिवस सातवा-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 01:12:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           "नवरात्रोत्सव"
                                            दिवस सातवा
                                              रंग निळा
                                           लेख क्रमांक-3
                                        -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक 13.१०.२०२१ -बुधवार, नवरात्रीचा सातवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र जोगवा , भोंडला आणि  इतर . (आजच्या दिवसाचा रंग निळा  आहे.)

     नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आल्यावर भुलाबाई हा प्रकार बघितला. भाद्रपद पौर्णिमेला शंकर-पार्वतीच्या मूर्ती बसवून त्यांच्यासमोर शाळकरी मुली टिपऱ्यांच्या तालावर गाणी म्हणत असत. शाळेतून आल्या आल्या हातात टिपऱ्या घेऊन, मैत्रिणींच्या घरोघर जाण्याची त्यांची लगबग गमतीची असे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी, टिपुर चांदण्यात, भुलाबाईला मखरात बसवून, आरास मांडून, पूजा केली जाई आणि बऱ्याच पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जाई. पन्नास वर्षांपूर्वी विदर्भात हे घडत असे, पण शाळांच्या वेळा, क्लासेस्चे चक्र, यातून मुलींना वेळ मिळेनासा झाला. अलीकडे फक्त कोजागरीच्या दिवशीच, भुलाबाई मांडल्या जातात. भुलाबाई हे देवीचेच रूप असून तिला गौराई म्हणता आणि ती माहेरवाशीण असते, यातील गाण्यांची सुरुवात, 'पहिली माझी पूजा बाई, देवादेव बाई' अशी होते नंतर, 'पहिल्या मासेचा गरवा, कधी येशील सरवा, सरता सरता कारागरी, नंदनगावच्या तीरावरी, आंबे बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे', अशी नऊ महिन्यांची नऊ फळे पिकतात आणि शेवटी, 'तिचे डोहाळे तिला भारी, नेऊनी घाला पलंगावरी, तेथे शंकर बसले, शंकर आमचे मेव्हणे, दीड दिवसाचे पाव्हणे,' अशी सांगता केली जाते. नवरात्र, देवी, ह्यंचा संबंध असा लहानपणापासून स्थापित होतो.

              नवरात्रीच्या आरतीतसुद्धा

'द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी,
सकलांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी'

     असे म्हटले आहे. परशुरामाची जननी म्हणजे रेणुका माता अर्थात माहुरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी, तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशंृगी हे अर्धेपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. तेथे दर्शनाला जाण्याची भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान गावातल्या देवीच्या दर्शनाला तर आवर्जून जातात. काही भगिनी दररोज दर्शन घेतात. अलीकडे, घरी नंदादीप लावणे शक्य होत नाही म्हणून मंदिरामध्ये पैसे देण्याची पद्धत रूढ होते आहे. नागपूरजवळ, कोराडीच्या मंदिरात, असे हजारो दीप लावले जातात. आग्याराम देवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते. पहाटे पाच वाजतासुद्धा, दर्शनाची भलीमोठी रांग पाहिल्यावर, कळसाचे दर्शन घेऊन परत आल्याचे माझ्या स्मरणात आहे. परत आल्यावर यशवंत स्टेडियममधल्या मंदिरात आम्ही गेलो. छोटेसेच मंदिर समोर सडा, रांगोळी घातलेली. सनईची  रेकॉर्ड लावलेली. प्रसन्न वातावरणात शांतपणे देवीचे दर्शन घेता येई म्हणून अनेक वर्षे नवरात्रीत एक दिवस तेथे सहकुटुंब दर्शनाला जात असू. आता त्याही मंदिराचा व्याप वाढला आहे. बाकी सर्व ठिकाणी गर्दी रेटारेटी होते, पण प्रताप नगरच्या दुर्गादेवी मंदिरात आजही, केव्हाही गेले तरी, शांतपणे दर्शन घेता येते. बाहेरच्या मंडपात प्रसादही मिळतो. ओटीसुद्धा व्यवस्थित भरता येते. येथील संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळतात. त्यांच्या सोयीप्रमाणे वेळा विभागून, त्या मंदिरात सेवा देतात. सगळी व्यवस्था चोख, वातावरणात शांत, सुरेल संगीत, मन प्रसन्न होते. शेवटी दर्शनाला जाऊन, मनाची शांतीच मिळाली पाहिजे.

     नागपूरमध्ये बंगाली लोकांच्या देवीचेही खूप माहात्म्य आहे. धंतोलीतील कालीमातेच्या मंदिरात, अमावास्येच्या रात्रीच मोठी पूजा असते. बाहेरगावी रहाणारे अनेक बंगाली लोक, या पूजेसाठी आवर्जून येतात. त्याशिवाय दीनानाथ हायस्कूलच्या प्रांगणात मोठी देवी बसविली जाते. तेथे मोठे प्रदर्शनही भरते. कलकत्त्यात तर, दुर्गापूजेचे खूप महत्त्व आहे. दुकानदार या पूजेच्या वेळी नवीन प्रकारचे कपडे विक्रीस आणतात. अगोदर कुणाला ती डिझाइन्स दाखवीतसुद्धा नाहीत.

   
                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता .कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.