"नवरात्रोत्सव"-दिवस आठवा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 14, 2021, 12:27:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                         दिवस आठवा
                                           रंग गुलाबी
                                         लेख क्रमांक-१
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१४ .१०.२०२१ -गुरुवार , नवरात्रीचा आठवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाचे महत्त्व , पूजा  विधी , कथा , आणि  इतर  माहिती . (आजच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे.)

                नवरात्रीचे महत्व आणि माहिती----

     आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरूवात होते. भाद्रपदामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे. आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. वर्षभरात नवरात्री तर तीन वेळा साजरी करण्यता येते. पण शारदीय नवरात्रीला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व (Importance Of Navratri In Marathi) आहे. खरंतर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत चार महिने अर्थात चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे होत असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे अर्थात घटस्थापना आहे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी आणि दसरा अर्थात विजयादशमी आहे 15 ऑक्टोबर, 2021 रोजी. नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. तर काही जण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात. हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याशिवाय या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात. या दिवसांचे नक्की महत्त्व काय आणि नवरात्र कधीपासून साजरे करण्यात येऊ लागले, याचा नक्की पौराणिक संदर्भ काय या सर्वांची इत्यंभूत नवरात्रीची माहिती

     आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालवधी मानण्यात येतो. शरद ऋतुच्या सुरूवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रौत्सव (Shardiya Navratri) असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते. तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

                  नवरात्रीत नक्की काय करण्यात येते----

     शारदीय नवरात्रौत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ देवींच्या रूपांची पूजाअर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी, आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यत येते. मात्र ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण आधी जाणून घेऊया.


--लेखिका - दीपाली नाफडे
  ----------------------- 

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .पॉप xo.कॉम)
              -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.10.2021-गुरुवार.