"कोजागिरी पौर्णिमा"- गद्यकाव्य लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 03:34:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "कोजागिरी पौर्णिमा"
                                       गद्यकाव्य लेख क्रमांक-१
                                     ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२१-मंगळवार आहे. आज "कोजागिरी पौर्णिमा" आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री, भाऊ-बहिणींना, या कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊया, कोजागिरी पौर्णिमेची माहिती, महत्त्व, लेख, कथा, पूजाविधी, कविता आणि इतर बरंच काही.

           आज उतरेल चंद्र, तुझ्या माझ्या अंगणात---

    खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागरी पौर्णिमेला. 'शारद सुंदर चंदेरी राती' आटवलेल्या केशरदुधात दिसणारा चंद्र तोच असला तरी, नवा नवा भासतो. कोजागरीचा उत्सवही असतोही आखीव-रेखीव. लोकगीतांना, लोककथांनाही चंद्रचांदण्यांची झालर असतेच.

     दर्याला भरती ओहोटी येते चंद्रामुळं असं विज्ञानानं सिद्ध केलंय, हृदयातल्या लाटाही चांदवा करतो की, खालवर. भारलेला चंद्र असा व्यक्तीपासून समष्टीपर्यंत साऱ्यांना भावणारा आहे. सूर्याच्या लख्ख अस्तित्वापुढेही चंद्रानं त्याची वेगळी ओळख मनामनांत, लपतछपत जपलीय, तीही सनातन काळापास्नं. एकीकडे भास्कराला आपण 'मित्र' म्हणत असूनही त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाही तिथं, चंद्र मात्र नकळत्या वयापासून जाणत्या शास्त्रज्ञांनाही खुणावतो. भुरळ घालतो. चक्क आपल्या भूवर पाय ठेवू देतो आणि त्यामुळंच जणू केवळ मित्रच नव्हे तर, 'स्मार्ट मित्र' बनतो. प्रेमाबिमात एरव्ही, 'टू इज कंपनी, थ्री इज क्राउड' असं समीकरण असलं तरी, चंद्र असतोच साक्षीला. त्याची नोंदही ठळक घेतली जाते. 'पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला' या, लोकसंगीताची नि लोकपरंपरांची नेमकी नस ओळखलेल्या जगदीश खेबूडकरांच्या गीतांतून ती पिढ्यानंपिढ्या आळवलीही जाते. 'शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,' म्हणत नारायण सुर्वे यांनी दु:खाची भरती पुन्हा चंद्राच्या साक्षीने आविष्कारली. तसा दर महिन्याला, संकष्ट चतुर्थीला, 'भाकरीचा तुकडा' (म्हणजेच पहिला घास) मोडण्यापूर्वी चंद्राची प्रतीक्षा करतात की, आजही अनेक जण आणि हातही जोडतात. त्यासाठी भिंतींवरल्या कॅलेंडरात चंद्रोदयाची वेळ बघतात, आताशा मोबाइलवरही तरंगते की ३०-३१ दिवसांच्या तिथ्या-नक्षत्रं. हा झाला महिन्याचा उपक्रम. पण खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागरी पौर्णिमेला. 'शारद सुंदर चंदेरी राती' आटवलेल्या केशरदुधात दिसणारा चंद्र तोच असला तरी, नवा नवा भासतो. शान्ता शेळकेंनी गुंफलेली शब्दफुले मग मनामनांत फुलून येतात, 'तोच चंद्रमा नभात' डोकवायला लागतो...

     नवरात्रींचा उत्सव नुकताच संपला. शक्तिदेवतेच्या गाभाऱ्यात भल्या पहाटे 'श्रीसुक्ता'चे स्वर घुमले, म्हटलं तर त्यातही 'चंद्रां हिरण्यवर्णीं लक्ष्मीं जातवेदो म आवह' आहे, तसेच 'आदित्यवर्णे तपसोधि जातो'ही आहे. चंद्रासारख्या शीतल आणि सूर्यासारख्या तेजस्वी देवतेचा उत्सवसोहळा म्हणजे या मातीच्या पूजनाचा कलशाध्याय जणू. घटस्थापना म्हणजे मातीचे अधिष्ठान आणि तिच्या हिरव्या अस्तित्त्वाला केलेले नमन. दिवट्या उजळून तिमिरातून तेजाकडे नेण्याचा संदेश नवरात्रींतून दिला जातोच. संबळ आणि डफाच्या साक्षीनं इथला गोंधळ चालतो त्यात जागरण कसं होतं ते कळतही नाही. झोपलेल्यांना जागं करण्याची, जागं ठेवण्याची हातोटी इथल्या देवता नि लोककलाकारांत आहे, त्याची आठवण म्हणजे कोजागरी. ' को जागरती?' असा सवाल करीत शक्तिदेवता चैतन्याचा नवा पोत प्रज्वलित करते. 'चिंध्या-चांध्या जमवुनि साऱ्या, पोतच लावीन गं, अंबा तुझा भोपी मी झालो गं, दोर कवड्या गुंफुनि माळच लावीन गं' असा धावा भक्त करतात. सुख-दु:खांच्या चिंध्या-चांध्यांशी दोन हात करण्याचे बळ देणारे कोजागरीसारखे उत्सव जगण्याची नवी उमेद जागवते आणि आयुष्याची परडी फुला-फळांनी भरभरून जाते.

लेखक -मंगेश कुलकर्णी
---------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.