"कोजागिरी पौर्णिमा"- गद्यकाव्य लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 03:36:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "कोजागिरी पौर्णिमा"
                                      गद्यकाव्य लेख क्रमांक-2
                                    ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२१-मंगळवार आहे. आज "कोजागिरी पौर्णिमा" आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री, भाऊ-बहिणींना, या कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊया, कोजागिरी पौर्णिमेची माहिती, महत्त्व, लेख, कथा, पूजाविधी, कविता आणि इतर बरंच काही.

                      आज उतरेल चंद्र, तुझ्या माझ्या अंगणात---

     कोजागरीचा उत्सवही असतो आखीव-रेखीव. लाकडी पाटावर पांढऱ्या रांगोळीनं चंद्र काढलेला वाटोळा. पाटाच्या खिळ्यांना पितळी चकत्या, चकाकणाऱ्या, नक्षीदार. अंगणात लिंबोणीच्या झाडामागे लपलेला साक्षात चंद्र आपली तयारी पाहात असतो. हलत्या झावळ्यांनी पश्चिमेचा गार वारा गावभर फिरवलेला असतो. तो जणू लपेटून जातो, मलमली शालीच्याही आतून-बाहेरून. कळशांमधले दूध पातेल्या ओतले जाते. चूल ढणढणते आहे. ज्वालांच्या जिभा चाटू लागतात पातेल्याला प्रेमानं. अंधारभारल्या गूढतेत पिवळ्या-जांभळ्या-लालबूंद पेटत्या सरपणाकडे पाहत राहतात डोळे, साकारू लागतात आकारविकार मनांमध्ये. कडकडणाऱ्या थंडीत हवीहवीशी वाटते उब. लगबग असतेच सुरू. अंगणभर. गगनाच्या अंगणातही कितीतरी जांभळ्या, पिवळ्या, तांबड्या तारकांची फुले फुलू लागलेली असतात. शिंपीत जाणारे चांदणे असतानाचा, 'गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी?' असा सवाल मनात येऊन शाली आणखी लपेटली जाते. खानदानी, पितळी, वजनदार खलबत्त्यातनं वेलची कुटणे एकीकडे दुसरीकडे जबाबदार हातात केशरडबी असतेच तयार. जायफळ किसायला, नव्या नवरीच्या हातात असते अन् तिची ही परीक्षा त्यानिमित्ताने होते. फडताळातल्या जाड काचेच्या बरणीतले बदाम-किसमिस, चारोळ्या हलकेच पडतात आटणाऱ्या दुधात. चंद्र रेखल्या पाटासमोर आटवलेल्या, मसालेदार दुधाचे पातेले ठेवले जाते. फुलवात, उदबत्तीने चंद्राची मनोभावे पूजा केली जाते. चंद्रच चंद्र कोजागरीच्या रात्री दिसतात. एक मुख्य आकाशात, दुसरा पाटावर रांगोळीतला, तिसरा दुधातला-प्रतिबिंबातला, चौथा जमलेल्या गर्दीत लाजणारा, फुलणारा, शिवाय प्रत्येकाच्या मनात असतोच प्रत्येकाचा चंद्र वेगळा. अगणित चंद्रांची, अगणित चांदण्यांची आकाशगंगा वाहू लागते, मग चंद्रपूजेनंतर.

     चूल गेली, सरपण गेलं, अंगण गेलं...त्यात बांधलेली हंबरणारी गाय साहजिकच उरली नाही. घराचं गोकूळ दोघा-तिघा-चौघांवर आलं. जागतिक पातळीवरच्या परिषदांमधनं 'क्लायमेट चेंज'वर चर्चासत्रं रंगू लागली. पूर्वी शरद-हेमंत ऋतुचा काळ म्हणजे निरभ्र आकाश आणि त्यात चालणारा प्रकाशोत्सव असे चित्र असे. आता त्यातही बदल होऊ लागलाय. ढग दाटू लागतात मध्येच. असे बदल सुरूच असतात. मात्र, तरीही बदलत नाही, ओसरत नाही ती चंद्राची आस. ती आजही आहेच. जुन्याबरोबरच नव्याही पिढीनं असोशीनं जपलीय कोजागरी. टेरेसमध्ये, गॅलरीत, वन-टू-थ्री बीएचकेच्या घरातनं दिसणाऱ्या आकाशाच्या छोट्याशा तुकड्यातनं डोकावणाऱ्या चंद्राच्या साक्षीनं पौर्णिमा रंगतेच. मनामनांतला चंद्र अधिकच मोठा होत जातो. शीतलता पसरत जाते अवघ्या जगण्यावर. मग, वाहतुकीचा, नोकरीचा, संघर्षाचा त्रास विसरून जातात माणसं. चंद्र हा अशा अनेक प्रश्नांवर उतारा आहे. मुळात सणासोहळ्यांची रचनाच त्यासाठी आहे. मनामनांतला अंधार गुडूप व्हावा यासाठीचा हा उपक्रम आता सार्वजनिकही होऊ लागला आहे. इतर कुठल्या-कुठल्या पेयांचे उत्सव करणारी पाश्चात्य संस्कृती चांगली ओळखीची होऊ लागली आहेच की आताशा; पण पूर्ण पेय असलेल्या दुधाचा असा लोकोत्सव, महोत्सव रंगविणारी आपली संस्कृतीओळख यापुढच्या काळातही अधिक गडद, रेखीव, ठसठशीत व्हावी. त्यातनं बलवान व्हावी पुढची पिढी, हा संदेशही कोजागरी देते आहे, वर्षानुवर्षांपासून....

     लख्खं चांदणं दिसण्याच्या रात्री अन् क्षणही आताशा कमी झालेत. झगझगीत प्रकाशानं शहरं, गावं आणि साहजिकच आकाशही कृत्रिम प्रकाशात न्हाऊन गेलं आहे. चांदणं अनुभवण्यासाठी थोडं दूर जावं लागतं. अजूनही दूरच्या खेड्यांवर पिठूर चांदणं पसरतं. ओल्या धुक्यात हरवून जाणारं गाव मग, वळसा घेणाऱ्या नदीवरनं येणाऱ्या गार वाऱ्यात छान झोपी जातं, लहान मुलासारखं. अशा खेड्यांत कोजागरीचा उत्सव शहरांपेक्षा अधिक स्मरणीय ठरणारा असतो. आता चाळिशी किंवा त्यापुढील पिढीच्या मनात नक्की असणार अशी कोजागरी. नव्या पिढीतल्या ट्रेकिंग करणाऱ्या, भटकणाऱ्यांच्याही आयुष्यात अनेकदा अशी कोजागरी फुलते. बाकी कातरवेळेला खिडकीतनं आकाशातली रंगपंचमी पाहत नंतर सांजवातेला मालिकांच्या जगात डुबून जाणाऱ्यांनाही चंद्राची साथ मालिकांच्या शीर्षकगीतांतनं लाभतेच. 'कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत' असं म्हणत 'वादळवाट' चालताना पुन्हा चंद्राचीच सोबत घेतात माणसं. चंद्राभोवती फेर धरायला कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार अशा सर्वच कलावंतांना आवडते. मग, श्रावणातली सर असो की, वळीव असो नाचरा, आजच्या काळातल्या लोकप्रिय गीतकार गुरू ठाकूरांना बावऱ्या मनाचे वागणे उलगडताना 'वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा' दिसायला लागतो. 'रात्र सुंदर, चंद्र सुंदर, चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे हर गात्र सुंदर, रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर..' अशी जणू समाधीवस्था संदीप खरेंनी अनुभवायला लावली आहेच. कोजागरीचा चंद्र, मसाल्याच्या केशरदुधात पाहताना एकमेकांना चांदणभर शुभेच्छा देताना टपोरा पूर्णचंद्र प्रत्येकानं मनात जपावा आणि आयुष्यातल्या अमावस्येला बाहेर काढावा इतकीच अपेक्षा.

लेखक -मंगेश कुलकर्णी
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.