म्हणी - "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही"

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 05:29:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही"

                                             म्हणी
                                          क्रमांक -59
                              "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही"
                             ----------------------------------

59. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
    --------------------------------

--क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
--शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.
--संस्कृतपर्यायः -न काकशापेन म्रियेत धेनु:।
--दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही.
--क्षुद्र लोकांच्या निंदेने थोर व्यक्तिंचे नुकसान होत नसते.
--क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही.
--वाईट माणसांच्या शापाने चांगल्या माणसांचे काही नुकसान होत नाही.
-- कोणत्याही चांगल्या कामात विघ्ने आणणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांमुळे चांगले काम होण्याचे राहत नाही...ते काम पूर्ण होतेच.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 ----------------------------------------------

--वाक्य वापर :-- संजयचा बॉसच्या निर्णयाला होत असणारा विरोध हा कावळ्याच्या शापासारखा होता.

     संपादकीय विशेष लेख :-- कावळय़ाच्या शापाने गाय मरत नाही !---

     हल्ली आपण वर्तमानपत्र वाचतोय की, चौथीच्या स्कॉलरशिपचे पुस्तक वाचतोय हेच कळत नाही. 'कावळय़ाच्या शापाने गाई मरत नसतात', काय, 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही', काय, जे कधी काळी चौथीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात वाचलं होतं ते आता वर्तमानपत्रात वाचायला मिळतंय. तेव्हा त्या म्हणी, ते वाक्प्रचार पटले असतील-नसतील, पण हल्ली मात्र ते सर्व पटू लागले आहे. का पटू नये? तेव्हा ते सांगणारे आमचे चौथीचे गुरुजी होते. ते काय बिचारे पगार मिळावा म्हणून जे सांगितलं ते शिकविणार! त्यांना कसला असणार अनुभव? आता मात्र हे सर्व सांगणारे 'आमचे दादा'च आहेत. दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री! आता 'आमचे दादा' वाचून दचकू नका. म्हणजे तसे दादा सगळ्यांचेच आहेत. दादा काय प्रत्येकालाच 'आपले'च वाटतात. दादांचा अनुभवही तसा दांडगाच आहे. म्हणजे 'इकडचा'ही आहे आणि 'तिकडचा'ही आहेच. त्याचं काय आहे ना की जो सत्ताधारी असतो ना तो आम्हाला 'आपला'च वाटतो. त्या अर्थाने दादा 'आमचे' आहेत, तर अशा या 'आमच्या' दादांच्या बोलण्यावर विश्वास तर ठेवावाच लागेल ना? नाही, त्या फडणवीसांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. येतो एखाद्याला विपरीत अनुभव. त्याला वेळ, काळ, बदललेले ग्रह, नक्षत्र कारणीभूत असतात. आता फडणवीसांच्या कुंडलीतले राहू, केतू, शनी, मंगळ, गुरू इकडचे तिकडे हलले असतील. कोणी वक्री झाला असेल, कोणी अस्त झाला असेल, कोणी निचेचा झाला असेल, कोणीतरी कोणाकडे तरी कोणत्या तरी घरातून बघितल्यामुळे फडणवीसांच्या कुंडलीत 'सत्ताभंग' योग तयार झाला असणार! त्याला आमचे दादा तरी काय करणार? नाही तरी म्हणतातच ना, 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!'

     हं, तर काय सांगत होतो की, आमचे दादा सांगत होते की, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.' अगदी बरोब्बर! शंभर टक्के बरोब्बर! कशी बरं मरणार कावळ्याच्या शापाने गाय? म्हणजे बघा, कावळा ब-याचदा गाईच्या पाठीवर बसूनच फिरत असतो, पोट भरत असतो. आता तुम्ही जिच्या पाठीवर बसून फिरतात, पोट भरतात, आपला कार्यभाग साधतात, तिलाच जर तुम्ही शाप देणार असाल तर ती कशी मरेल? त्यातही कावळा विरोधी पक्षातला असेल आणि गाय सत्ताधारी पक्षातली असेल तर विरोधी पक्षातल्या कावळ्याच्या शापाने ती मरेलच कशी? हो, पण जर का कावळा आणि गाय दोन्ही सत्ताधारी पक्षातलेच असले, तर मात्र कावळ्याच्या शापाने गाय मरू शकते, नव्हे ती शंभर टक्के मरतेच. जिज्ञासूंनी एकनाथराव खडसे ऊर्फ नाथाभाऊंचे 'कावळ्याच्या शापाने मेलेली गाय!' हे आत्मचरित्र (जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा) आणि त्याची पंकजा मुंडेंनी लिहिलेली प्रस्तावना (ही सुद्धा प्रकाशित होईल तेव्हा) जरूर वाचावी.

     मागे एकदा असंच झालं. एका सत्ताधारी पक्षाच्या गाईच्या पाठीवर एक कावळा बसलेला असायचा. गाय जिकडे नेईल तिकडे तो जायचा. मिळेल ते खायचा. मग हळूहळू त्याच्या लक्षात आलं की, आपण तर पूर्णपणे या गाईवर अवलंबून आहोत आणि ही आपल्याला फसवतेय. मलिदा सगळा ही मटकावून जाते आणि आपल्या वाटय़ाला उरसूर येते. त्याने संतापून त्या गाईला शाप दिला, 'तू जशी माझी दिशाभूल करून मला फसवलं तसंच तुझी दिशाभूल करून तुलाही कोणीतरी फसवेल. तू स्वत:ला 'अजित' समजतेस, पण तू 'अजित'कडूनच 'फजित' होशील!' सत्ताधारी गाईच्या पाठीवर बसलेल्या कावळ्याच्या शापाने ती गाय मेली तर नाही, पण तिला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. सत्यनारायणाच्या कथेतल्या साधू वाण्यासारखी तिची परिस्थिती झाली. कबूल केलेला नवस फेडला नाही म्हणून त्याचं जसं सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. तसंच कबूल केलेलं दिलं नाही म्हणून या गाईचं सगळं होत्याचं नव्हतं झालं. राहतं घर गेलं, गाडी- बंगला, नोकर-चाकर सगळं गेलं, रस्त्यावर ओरडत फिरण्याचे दिवस आले. त्या गाईनेही साधू वाण्यासारखी माफी मागण्याचे कबूल केले होते ते देण्याचा प्रयत्न केला. सत्यनारायण दयाळू होता. त्याने साधू वाण्याला माफ केलं, हिरावून घेतलेले सर्व पुन्हा देऊन टाकलं, पण या आधुनिक कावळ्याला मात्र सत्ता नारायण पावला होता. त्याने त्या गाईला माफ केलं नाही.

लेखक-मुकुंद परदेशी
-------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-प्रहार.इन)
                       ------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.