"विश्व पोलियो दिवस"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:14:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "विश्व पोलियो दिवस"
                                            लेख क्रमांक-2
                                      ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-२४.१०.२०२१-रविवार होता. कालचा  दिवस "विश्व पोलियो दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

     पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे मज्जारज्जू, तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.

     हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले, आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. पोलियोच्या लसी विकसित करण्याचे श्रेय जोनस सॉल्क (१९५२) व अल्बर्ट सेबिन (१९६२) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ व रोटरी इंटरनॅशनल या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

     २००० मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील चीन आणि ऑस्ट्रेलिया मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. २००२मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता (२००६ नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त भारत, पाकिस्तान, नायजेरिया, व अफगाणिस्तान या चार देशांमध्येच आढळून येत होते. (मार्च २७,२०१४ ला) जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे भारत देशाला १०० प्रतिशत पोलियोमुक्त जाहीर करण्यात आले. भारतात सरकारने (१९९५) साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त होऊ शकला.

======================
अनुक्रमणिका---

१   व्याख्या
२   संशोधन
३   कारणे आणि लक्षणे
४   निदान
५   लसीकरण
६   इम्युनायझेशन
७   साथींचा अभ्यास
८   उपचार
९   पूर्वानुमान
१०   इतिहास
११   भारताचे शेजारी देश
१२   पोलिओचा 'दुसरा' विषाणू हद्दपार
=======================

                           1-व्याख्या---

     पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता सस्थेवर परिणाम करतो. लक्षणामध्ये सौम्य पक्षाघात विरहित किंवा पूर्ण पक्षाघात असे सर्व परिणाम या आजारामुळे काहीं तासात होतात.

     वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप वन या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर २०० रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर १००० संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशींच्या आवरणाला दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेहर्‍याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो.

     पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषिता आहे. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. पण पोलिओ प्रौढाना होऊ शकतो. पोलिओचे कारण दाट लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान व स्वच्छतेचा अभाव हे आहे. अशा वातावरणात पोलिओ सहज पसरू शकतो. पोलिओचा धोका वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारा शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, नुकत्याच टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती याना अधिक असतो.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
-------------------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग/विकी)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.