म्हणी-"काखेत कळसा नि गावाला वळसा"

Started by Atul Kaviraje, November 25, 2021, 06:24:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "काखेत कळसा नि गावाला वळसा"

                                            म्हणी
                                          क्रमांक-81
                             "काखेत कळसा नि गावाला वळसा"
                            --------------------------------


81. काखेत कळसा नि गावाला वळसा
    -------------------------------

           काखेत कळसा गावाला वळसा(कथा क्रमांक-2)---
          ------------------------------------------

     रोहनला हल्ली पाळणाघरात जाण्याचा कंटाळा येऊ लागला होता नर्सरी आणि केजीपर्यंत मित्रांशी खेळायला मिळणार म्हणून तो आनंदाने तिथे जात असे...

     रोहनला हल्ली पाळणाघरात जाण्याचा कंटाळा येऊ लागला होता. नर्सरी आणि केजीपर्यंत मित्रांशी खेळायला मिळणार म्हणून तो आनंदाने तिथे जात असे. पण, नंतर त्याला पाळणाघरात जाण्याचा कंटाळा येऊ लागला. तिसरीच्या वर्गात गेल्यापासून त्याला सतत वाटे, की आईने नोकरी सोडून घरी राहावं. शाळेतून आल्यावर आईबरोबर बसून गप्पा मारत जेवावं. अभ्यास करावा, नकोच ते पाळणाघर. पण, आईला सांगितल्यावर ती त्याची समजूत काढताना सांगे, 'आताच मला नोकरी सोडून नाही चालणार बाळा. आपल्या या मोठ्या फ्लॅटचं कर्ज फिटलं, की मग मी अजिबात नोकरी करणार नाही. तोपर्यंतच फक्त तू पाळणाघरात जा.'

     विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कधी?; 'या' तारखेला महत्त्वपूर्ण निर्णय होणार
लहान असल्यामुळे त्याला एकट्याला बराच वेळ घरात ठेवण्याचीही आई-बाबांना भीती वाटे. काही लागलं, पडला तर काय करायचं? म्हणून त्यांना पाळणाघराचा पर्याय त्यातल्या त्यात सुरक्षित वाटे. रोहनही शहाण्या मुलाप्रमाणे आईचं ऐकून नाखुशीने का होईना पाळणाघरात जात होता.

     एकदा मात्र रोहनला आईचा खूप राग आला. त्या दिवशी सकाळी शाळेत जाण्याच्या वेळीच त्याला ताप आला आणि डोकं दुखायला लागलं. आपण आजारी असल्यामुळे आज पूर्ण दिवस आई आपल्याजवळ थांबेल असे रोहनला वाटले. पण, त्याच दिवशी महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे आईला रजा घेणे शक्य नव्हते आणि बाबा टूरवर गेले असल्याने रोहनला एकट्यालाच घरी थांबावे लागले. रोहनला आई-बाबांची अडचण समजत होती आणि आई-बाबांनाही रोहनची मनस्थिती उमगत होती. परंतु, सर्वांचाच नाईलाज होता. त्याला नेहमी वाटे, घरी कोणीतरी कायमचे आपली सोबत करणारे, आपली काळजी घेणारे असते तर किती बरे झाले असते! आई-बाबांकडून रोहनला हवं ते मिळत होतं. सर्व सुखे त्याच्या दिमतीला हजर होती. पण, एकाकीपण त्याच्या मनात व्यापून उरला होता.

     रोहनचे बाबा टूरहून आले तेच एक नवीन बातमी घेऊन. रोहनच्या आजोबांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे गावाहून आजोबा व आजी पायाच्या ऑपरेशनसाठी व पुढील उपचारांसाठी रोहनच्या घरी येणार होते. गावी असलेला वडिलोपार्जित मोठा व्यवसाय व शेती सोडून रोहनचे बाबा शहरात नोकरीसाठी आल्यामुळे त्यांची आई त्यांच्यावर नाराज होती. त्यामुळे ती काही त्यांच्याकडे येत नसे. अधूनमधून हे सर्वजण गावी जात तेव्हा फक्त आजी-आजोबांची भेट होत असे. तेवढाच रोहनला त्यांचा सहवास लाभत अशे. आता आजारपणामुळे प्रथमच ते इतके दिवस रोहनच्या घरी राहणार होते. त्यांच्या आजारपणामुळे रोहनच्या जीवनात मात्र आनंदाचे दिवस आले होते. त्याचे पाळणाघरात जाणे बंद झाले होते. घरातील वर्दळ, आजी-आजोबांच्या गप्पा, आई-बाबांची धावपळ हे सगळं पाहताना त्याला मजा वाटत होती. हळूहळू आजी-आजोबा नवीन घरात रुळू लागले. आईलाही घरकामात आजीची मदत होऊ लागली आणि रोहनला आजीची गाणी, आजोबांच्या गोष्टी यात रमता रमता अभ्यासाला अधिकच उत्साह वाटू लागला. आजी त्याचा मराठीचा अभ्यास घ्यायला लागल्यापासून तो विषय त्याला आवडू लागला. शाळेत शिकवलेल्या म्हणींचा अर्थ आई-बाबांपेक्षा आजी चांगल्या प्रकारे समजावून सांगत असे. कालच वर्गात मराठीच्या शिक्षकांनी 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' या म्हणीचा अर्थ लिहून आणायला सांगितला. बाबांना तो नीट सांगताच येईना. पण, आजीने चटकन सांगितला. 'एखादी वस्तू आपल्या अगदी जवळ असली, तरी आपले त्याकडे लक्ष नसते. त्यामुळे आपण खूप लांबवर ती वस्तू शोधतो आणि नंतर ती सापडते अगदी जवळच!' हे उत्तर ऐकून काका म्हणाले, आई तू मला आणि ताईला शिकवायचीस, अजूनही त्याच उत्साहाने रोहनलाही शिकवतेस.

     असे हे रोहनचे आनंदाचे दिवस मात्र चटकन संपले आणि आजी-आजोबांची गावी जाण्याची वेळ आली. हे कळले आणि रोहनने रडून आकांत केला. त्याने सर्वांशीच अबोला धरला. आजी-आजोबांनी कायम येथेच राहण्याचा त्याचा हट्ट होता. त्याच्या आई-वडिलांनाही त्याचा हट्ट योग्य असल्याचे पटले होते. आजी-आजोबांचा रागही मावळला होता. शेवटी रोहनच्या बाबांनी गावी जाऊन सगळ्या व्यवसायाची आणि शेतीची योग्य व्यवस्था लावली आणि आजी-आजोबांना कायमचे तेथेच ठेवून घेतले. रोहनला आता पाळणाघरात जाण्याची गरज उरली नाही. तो आजीला म्हणाला, 'आजी, याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्या घरातच एवढ्या प्रेमाची, मायेची माणसे असताना चांगल्या पाळणाघराची शोधाशोध करण्यासाठी काय गरज आहे? प्रत्येक घरी असे आजी-आजोबा असतील, तर पाळणाघरांची गरजच पडणार नाही.'


--डॉ. माधवी लोंढे, त्र्यंबकेश्वर
--------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.11.2021-गुरुवार.