II मेरी ख्रिसमस - शुभ नाताळ II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, December 25, 2021, 03:07:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II मेरी ख्रिसमस - शुभ नाताळ II
                                             लेख क्रमांक-3
                                 -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.१२.२०२१-शनिवार आहे. प्रभू येशू यांचा जन्म दिवस. हा शुभ दिन,सण  नाताळ, किंवा ख्रिसमस या नावानेही साजरा केला जातो. मराठी कवितेतील माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस नाताळाच्या  माझ्या  हार्दिक शुभेच्छा. "मेरी ख्रिसमस - शुभ नाताळ", "हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस". जाणून घेऊया, या दिनाचा इतिहास, कहाणी,माहिती, महत्त्वाचे लेख, कविता, गाणी आणि बरंच काही.

                     नाताळ माहिती, इतिहास---

     येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक. प्रेम, करुणा, मानवता, अहिंसा व दुःख सहनशीलता यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे येशू. येशू म्हणजे त्याग, दया, करुणा, वात्सल्य यांचा संगम. जेरुसलेमजवळील बेथलहेम नावाच्या एका खेड्यात यहुदी कुटुंबात येशूचा जन्म झाला. मेरीमातेचा हा पुत्र एका गोठ्यात जन्मास आला. येशूच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला म्हणजे मेरीला देवदूताने दर्शन देऊन सांगितले होते 'मरिये, घाबरू नकोस. तुझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. तू कुमारिका असतानाच परमेश्वर तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्मास येईल. त्याचे नाव येशू ठेव.

     सगळे जग त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तो सर्व मानवजातीचे दुःख नाहीसे करील.' येशूचा जन्म झाला त्या दिवशी काही मेंढपाळ जवळच्याच एका डोंगरावर आपली मेंढरे घेऊन वस्तीला राहिले होते. त्या वेळी कडाक्याची थंडी असल्याने ते शेकोटी पेटवून शेकत बसले होते. त्या वेळी आकाशात एक तेजस्वी तारा चमकू लागला व आकाशवाणी झाली : जगाचा उद्धारक व शांतिदूत जन्मास आला आहे. हे ऐकताच आश्चर्यचकित झालेले मेंढपाळ हे काहीतरी अघटित घडत आहे, असे म्हणून मसीहाला शोधण्यासाठी गावात गेले. बेथलहेम गावातच मेरीचा गोठा होता.

     तो स्वर्गीय ताराही तेथेच थांबला. मसीहा येथेच जन्मास आला असणार, असा विचार करून मेंढपाळ त्या गोठ्यात गेले. तेथे मेरी नुकत्याच जन्मास आलेल्या बाळाला फडक्यात गुंडाळून घेऊन बसली होती. मेंढपाळांनी त्या बाळाचे दर्शन घेतले व परमेश्वराच्या नावाचा जयजयकार केला व देवदूताने सांगितलेले शुभ वर्तमान सांगितले. मेरीला खूप आनंद झाला. याच वेळी तो तारा पूर्वेकडील अनेक देशांत दिसला. त्यावरून येशूच्या अवताराची बातमी सर्वांना समजली. डिसेंबरची २५ तारीख हा येशूचा जन्मदिवस. यालाच ख्रिसमस किंवा नाताळ असे म्हणतात. येशूच्या जन्मदिनाचा हा सण ख्रिस्ती बांधव अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. बहुतेक सर्व चर्चमध्ये २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिन म्हणून पाळतात.

     अर्मेनियन चर्च मात्र ६ जानेवारीला म्हणजे येशूच्या बाप्तिस्माच्या दिवशी हा दिवस साजरा करतात. येशूचे वधस्तंभावरील मरण, पुनरुत्थान व त्यानंतरचे त्याचे स्वर्गारोहण हे दिवस जसे ठराविक पद्धतीने विधी म्हणून साजरे केले जातात, तसे नाताळचे नसते. परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी नाताळ हा सण साजरा केला जातो. आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला संध्याकाळी (ज्याला ख्रिसमस ईव्ह म्हणतात) सशोभित केलेल्या चर्चच्या अंगणात सर्व ख्रिस्ती स्त्री-परुष रंगीबेरंगी कपडे घालन एकत्र जमतात व गाणी म्हणतात.

     काही ठिकाणी या वेळी मद्यप्राशन करण्याची पद्धत आहे. नंतर रात्री १२ वाजता चर्चमध्ये घंटानाद सुरू होतो. त्या वेळी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. लहान मुले व तरुण रात्री बारापासून पहाटेपर्यंत अनेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. २५ डिसेंबरला पहाटे चर्चमध्ये मास नावाचा भक्तिपर उपासनाविधी मोठ्या प्रमाणावर होतो. २४ डिसेंबरच्या रात्री घरात व चर्चमध्ये सुफलतेचे प्रतीक म्हणून ख्रिसमस वृक्ष रोषणाई करून नाताळच्या दिवशी नवे कपडे परिधान करणे, शुभेच्छा कार्डे पाठविणे, एकमेकांना भेटवस्तू देणे इत्यादी गोष्टी चालू असतात.

     लहान मुले नाताळच्या आदल्या रात्री झोपी जाण्यापूर्वी पलंगाला मोजे टांगून ठेवतात. वर्षभर जी मुले चांगली वागतात त्यांची नावे देव सांताक्लॉजला देतो. तो त्या मुलांना त्या रात्री छोट्या छोट्या भेटवस्तू देतो असे मानले जाते. सकाळी उठल्यावर त्या मुलांना त्या मोज्यांत भेटवस्तू भरलेल्या दिसतात. रात्री सांताक्लॉज धुराड्यातून घरात उतरून त्या वस्तू ठेवून गेला, असे मुलांना सांगितले जाते. सांताक्लॉजला इंग्लंडमध्ये ख्रिसमस फादर म्हणतात. नाताळच्या दिवशी विविध प्रकारचे केक तयार करण्याची पद्धत आहे.

     भारतात डेव्हिडच्या ताऱ्याबरोबरच घरात व घरावर दिवाळीप्रमाणे पणत्या लावणे, आकाशदिवे लावणे, ख्रिस्ती गीते म्हणणे, फटाके उडविणे, केक ऐवजी भारतीय पक्वाने तयार करणे इत्यादी कार्यक्रम केले जातात. नाताळच्या पहिल्या आठवड्यातील पहिला दिवस बॉक्सिंग डे म्हणून पाळण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. जे लोक वर्षभर आपल्याला उपयोगी पडले, आपल्याशी प्रेमाने वागले त्यांना त्या दिवशी भेटवस्तू बॉक्समधून देतात. असा हा 'नाताळ' किंवा 'ख्रिसमस' सण ख्रिश्चन बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा सण आहे. आपण सर्वांनीच या आनंदात सहभागी व्हावयास हवे.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगुरु.इन)
                      ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2021-शनिवार.