II मकर संक्रांति II-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:13:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II मकर संक्रांति II
                                            लेख क्रमांक-5
                                       --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                    मकरसंक्रांत कशी साजरी करतात---

     स्त्रिया या दिवशी मातीची पाच मडकी घेऊन त्यांत तीळ, भुईमूगाच्या शेंगा, उसाचे करवे, कापूस, हळद-कुंकू वगैरे घालून एकमेकींना वाण देतात. या मडक्यांना सुगड असे म्हणतात. सुगड म्हणजे 'सुघट'. तसेच या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत एकमेकांना तिळगूळ अगर हलवा देऊन 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणावे व परस्परांत स्नेह वाढवावा अशी कल्पना आहे.

     नवीन जन्मलेल्या मुलाला व नवीन लग्न झालेल्या नववधूला या दिवशी हलव्याचे दागिने करून घालतात व नववधूच्या हस्ते सुवासिनींना वाण देतात. या दिवशी नदीवर अगर समुद्रावर जाऊन स्नान करावे व तिळा-तांदळाचा नैवेद्य दाखवावा, अशी पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवसांमध्ये शरीरस्वास्थ्य राखण्यासाठी काही प्रथा पाडल्या आहेत.

     जानेवारीत थंडीचे दिवस असतात, तेव्हा मुगाची डाळ व तांदूळ यांची खिचडी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी व लोणी असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे पदार्थ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला करतात. तसेच थंडीमुळे कोरडी झालेली त्वचा मऊ व्हावी म्हणून तीळ वाटून अंगाला लावतात. तीळ व गूळ यासारखे स्निग्ध व गोड पदार्थ या दिवसांत शरीराला पोषक असतात. कोकणात घावन-घाटले करतात. काही ठिकाणी खीर करतात, तर काही ठिकाणी गुळाच्या पोळ्या आणि कणीदार तूप असा महाराष्ट्रात संक्रांतीचा खास बेत असतो. हलवा, तिळाच्या वड्या व लाडू करतात. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून 'तिळुवा' नावाचा पदार्थ करतात.

     संक्रांतीचा सण खरा तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. किंक्रांतीच्या दिवशी वर्षाच्या आतल्या मुलांना बोरनहाण घालतात. म्हणजे त्याच्या डोक्यावर बोरे घालतात व या कार्यक्रमाला इतर लहान मुलांना बोलावतात.

     मकरसंक्रांतीची आणखी एक गंमत म्हणजे पतंग उडवण्याचा खेळ! मुंबईसारख्या शहरात अनेक मुले, मोठी माणसे घराच्या गच्चीतून, गॅलरीतून, मैदानातून दिवसभर पतंग उडवतात. काही ठिकाणी पतंग उडवण्याच्या किंवा कागदाचे मोठेमोठे पतंग तयार करण्याच्या स्पर्धाही होतात.

     निसर्गात होणारे बदल, धार्मिक व्रत, तसेच सामाजिक उत्सव या तीनही गोष्टींचा मिलाफ मकरसंक्रांतीच्या उत्सवात होतो.

     संक्रातीच्या या स्नेहवर्धक सणाचे आणखी एक आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या दिवसांत इष्टमित्र, नातेवाईक हे दूरदूर अंतरांवर राहतात व तिळगुळांसाठी प्रत्यक्ष भेट शक्य असत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टपालामार्फत शुभेच्छादर्शक पत्रे पाठवली जातात. सध्याच्या संगणक युगात कागदावरील शुभेच्छांची जागा ई-मेलने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत हलवा, तिळगुळाचे दोन-चार दाणे तरी पाठवले पाहिजेत या भावनेमुळे अजून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छापत्रे संक्रांतीस पाठवली जातात.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मी.कॉम)
                      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.