संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण

Started by Rahul Kumbhar, May 01, 2010, 12:10:12 AM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सुवर्ण वर्षाबद्दल सर्वाना हार्दिक शुभेच्छा . ह्या आनंदोत्सवाच्या शुभेच्छा इथे द्या..  :)

Rahul Kumbhar

जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.. ;D

prashantpatilit

महराष्ट्राच्या सुवर्न्मोह्त्स्वी वर्ष्याच्या हार्दिक शुभेछा,जय जय महाराष्ट्र माझा,गरजा महाराष्ट्र  माझा.........  मराठी  पाऊल पडते पुढे......

devshishshinde

ह्या महाराष्ट्र दिन निम्मित्ताने  माझे मुंबई स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

Vish99

महराष्ट्राच्या सुवर्न्मोह्त्स्वी वर्ष्याच्या हार्दिक शुभेछा.

जय महाराष्ट्र ! जय मराठी !  :)

Vish99

संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सुवर्ण वर्षाबद्दल सर्वाना हार्दिक शुभेच्छा .

जर मराठी अस्मिता टिकावायाची असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात मराठी बोलण्याचा वापर केला पाहिजे...

जय महाराष्ट्र ! जय मराठी !


MK ADMIN

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

http://www.in.com/music/track-jai-jai-maharashtra-maza-188315.html

Vkulkarni

दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात 'संयुक्त महाराष्ट्राच्या' मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 'महाराष्ट्र एकीकरण परिषद' भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी 'हरिजन' मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. 'भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी', असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून 'अकोला करार' केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी 'मुंबई कुणाची' हा कार्यक'म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी 'मुंबईसह महाराष्ट्र' यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची 'जेव्हीपी' समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत – वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी 'मुंबईसह महाराष्ट्र' चा ठराव मांडला.
महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, 'पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही', अशी वल्गना केली. विधानसभेत 'त्रिराज्य' स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात 'लोकमान्य' पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.
दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी 'द्वैभाषिकाची' घोषणा केली. 'विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ', अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि'या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची 'री' ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे 'संयुक्त महाराष्ट्र समिती' ची स्थापना झाली.
ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत 'महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु'यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गिळून टाकली असती. आज मुंबई तथाकथित कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे एकत्रितपणे कंठशोष करुन सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०६ मराठी हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी वाचायलाच हवा, मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते मुंबईला कॉस्मोपॉलिटिन म्हणणारे काय जाणोत? त्यांना ते आपणच सांगायला हवे, पण त्यासाठी आधी ते आपल्याला तरी माहीत असायला हवे की नको?

Vkulkarni

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.
याला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.
पण यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. चिंतामणरावांना खरेतर आधुनिक महाराष्ट्राचे रामशास्त्रीच म्हणायला हवे. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०६ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम आजही ठसठसती आहेच. त्यात आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचीही भर पडली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले.
संयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला 'सोन्याचा दिवस' असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते, की 'महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`
1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस! या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.