II माघी गणेश जयंती II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:05:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II माघी गणेश जयंती II
                                          लेख क्रमांक-2
                                   ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

     आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. माघी गणेश जयंतीला तीळकुंद जयंती, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीचा जन्म झाला. पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक गणेशलहरी सक्रीय असतात. या तिथीला नेहमीच्या तुलनेत हजारो पटीने जास्त प्रमाणात गणेश तत्व सक्रीय असते. याच कारणामुळे माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मनोभावे गणपतीची आराधना करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, असे म्हणतात.

     गणपतीच्या तीन अवतारांच्या कथा लोकप्रिय आहेत. यापैकी एक कथा आहे माघी गणेश जयंतीची कथा. याच दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले जाते. स्कंद पुराणातील कथेनुसार नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या घरी गणपती विनायक या अवतारात अवतरला. ही घटना माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी घडली. याच कारणामुळे हा दिवस विनायकी अथवा विनायक चतुर्थी म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी उपवास करतात आणि धुंडीराज गणेशाला तीळ आणि मोदकांचा प्रसाद दाखवतात.

     आजच्या दिवशी गणपतीची पूजा करणे जास्त लाभदायी समजले जाते. जाणून घ्या माघी श्रीगणेश जयंती निमित्त कशी करावी गणपतीची पूजा...

     आजच्या दिवशी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे पूजा करणे जास्त लाभदायी समजले जाते. घरातल्या देवतांची तसेच गणपतीची मनापासून पूजा करा. पूजा करताना गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपतीचे आपल्या माहिती असलेले अन्य श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणा. आपल्या परिसरात गणपती मंदिर असेल आणि तिथे दर्शनासाठी जाणे शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवदर्शन करा अन्यथा घरातच गणेशपूजन करा.

     मंदिरात गणपती दर्शनासाठी जाणार असल्यास काळजी घ्या. मास्क घालून घराबाहेर पडा आणि सोशल डिस्टंस (दो गज दुरी) कायम राखा. शक्यतो जवळच्या मंदिरात जा. मंदिरात चालत जा. देवदर्शनासाठी चपला मंदिराबाहेर काढून ठेवा आणि मंदिरात प्रवेश करा. मंदिरात प्रवेश करताना साबणाचा वापर करुन हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करा, ती सोय नसल्यास सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन स्वतःच्या हातरुमालाने कोरडे करा. गणपतीचे लांबून मनोभावे दर्शन घ्या. मूर्ती आणि घंटा तसेच मंदिरात इतरत्र कुठेही स्पर्श करणे टाळा. इतर भाविकांपासून 'दो गुज दुरी' (सोशल डिस्टंस) ठेवा. कोरोना संकटाचे भान राखा आणि आवश्यक ती खबरदारी घ्या.

                  माघी गणेश पूजनाचा विधी---

     सकाळी लवकर उठून नित्यकर्म, आंघोळ आदी आटपून नंतर पूजाविधीचा संकल्प धरावा. गणपतीची एका चौरंगावर अथवा पाटावर स्थापना करावी. गणपतीचे आवाहन करावे. षोडषोपचार पूजा करावी. गणपती, महादेव (शंकर), गौरी (पार्वती), नंदी आणि कार्तिकेय यांचीही मनोभावे पूजा विधीपूर्वक करावी. गणपतीला जास्वंदाची फुले आणि दुर्वा प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला जास्वंदाची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्या. यानंतर अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे. गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणायला हरकत नाही. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवावा.

     भाद्रपद चतुर्थीला गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. तर माघी गणेश जयंती निमित्त गणपतीला तिळापासून तयार केलेल्या लाडवांचा अर्थात तीळकुंद या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. तीळकुंद नसल्यास घरात तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. काही कारणामुळे पूजेच्या वेळी घरात कोणताही पदार्थ तयार नसेल तर दूध, गूळ, साखर यापैकी एखाद्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. अग्नीपुराणात मोक्षप्राप्तीसाठी तीळकुंद या पदार्थाचा नैवेद्य सांगितला आहे.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.