बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम

_ वा. गो. मायदेव

MK ADMIN

खंड्या

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.
गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.

(कवी माहीत नाही)

MK ADMIN

श्रावण बाळ

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी

त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ

परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी

कवी : ग. ह. पाटील

MK ADMIN

केशवसुत यांच्या "आम्ही कोण?" या मुळ कवितेचे प्र. के. अत्रे यांनी केलेले विडंबन]

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - प्र. के. अत्रे

MK ADMIN

सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन् गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ३ ॥

- कुसुमाग्रज

MK ADMIN

गे मायभू

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

- सुरेश भट

MK ADMIN

बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

चल सालस पण धरुनी निखालस बोला खोट्या बोलू नको
अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरु नको ||

नास्तिक पणात शिरुनि जनाचा, बोल आपणा घेऊ नको
भली भलाई करा काही, पण अपधर्मंमार्गी शिरू नको ||

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नको
बुडवाया दुसरयाचा ठेवा, करुनी हेवा झटू नको ||

उगाच निंदा स्तुति कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची मैत्री करू नको ||

कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको
आल्या अतिथि मुठभर द्याया मागे पुढती पहु नको ||

हिमायतीच्या बले गरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेवू नको ||

सुविचारा कतरू नको , सतसंगा अंतरु नको
द्वैताला अनुसरू नको , हरिभजना विसरु नको ||

संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

MK ADMIN

अनंत


अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत।

कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?

विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?

अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?

तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून।

कवी - बालकवी

MK ADMIN

तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)

MK ADMIN

"नसती उठाठेव"

मोठे होते झाड वाकडे,
तिथे खेळती दोन माकडे
गंमत झाली भारी बाबा,
गंमत झाली भारी

खरखर खरखर सुतारकाका,
कापीत होते एक ओंडका
भुरभुर भुरभुर भुसा उडाला,
माकड मज्जा पाहू लागला

निम्मे लाकूड चिरुन झाले,
दुपार होता काम थांबले
पाचर ठोकून सुतार गेले,
खावयास भाकरी

माकड टुणकन खाली आले,
पाचर हलवूनी काढु लागले
शहाणे दुसरे त्यास बोलले,
धोक्याचे हे काम न आपुले

पहिले आपला हट्ट न सोडी,
जोर लावूनी पाचर काढी
फटित अडके शेपूट तेव्हा,
माकड हाका मारी

उठाठेव ही नसती सारी,
सुतार त्याला फटके मारी
म्हणून करावा विचार आधी,
नंतर कामे सारी

(अनभीज्ञ)