II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:32:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                            निबंध क्रमांक-1
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                     छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध बघणार आहोत. साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून हिंदवि स्‍वराज्यात सुख आणि शांतीने जगण्‍याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला . अश्‍या या महान योध्‍याला नमन करूया आणी सुरूवात करूया निबंधाला.

     सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब  बहाल केला.

     महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली.

     सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

      स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.

     शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.

     प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता.

     त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली.  अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.

      प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.

     अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे मराठी.कॉम)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.