II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:34:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          निबंध क्रमांक-2
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                   छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारतवर्षात होऊन गेले त्या सर्वांमध्ये श्री शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते. कारण त्या राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले.

     प्रतिकूल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना ते 'शिवाजी महाराजांचे राज्य' असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वतःचे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती.

     जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजीमहाराज प्रतिनिधी होते.  'लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.'एका सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.

     खरोखर 'स्वत:च्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते,' स्वराज्य स्थापन करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ऱ्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.

     शिवाजीमहाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. 'श्रीमान योगी' होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.

     शिवाजीमहाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत  होते.

     महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. त्यांचा धर्माभिमान औरंगजेबासारखा नव्हता. ते परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते.

     सर्व धर्मांना, मतांना, आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते. आग्ऱ्याच्या नजरकैदेत असताना त्यांचा अंगरक्षक 'मदारी मेहतर' होता. तो महाराजांचा विश्वासू सेवक होता. प्रजेला अत्यंत शुद्ध समतोल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्यवस्था महाराजांनी केली.

     रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली.
स्वत:चे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन, सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खऱ्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे मराठी.कॉम)
                      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.