II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:41:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          निबंध क्रमांक-6
                             ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                 छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     शिवरायांच्या जन्मापूर्वी विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि मुघलशाही यांच्या त्रासाने आणि जुलमी अत्याचाराने सारा महाराष्ट्र होरपळून गेला होता. यवनांच्या त्रासाने लोक हवालदिल झाले होते. त्याचवेळी सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका वीरपुत्राचा जन्म झाला. तो वीरपुत्र म्हणजेच छत्रपती शिवराय!

     जिजामाता आणि शहाजीराजे यांच्या पोटी जन्मलेला बालशिवाजी सह्याद्रीच्या कड्या-कपारीत खेळू लागला, बागडू लागला. जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांना राजकारणाचे आणि राज्यकारभाराचे धडे मिळू लागले. रामायण, महाभारतातील गोष्टींतून त्यांचे बालमन संस्कारित होऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी शिवरायांची फलटणच्या निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी विवाह झाला.

     इ.स. १६४५ साली लहान वयातच बाजीप्रभू, तानाजी मालुसरे सारख्या निवडक मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले ताब्यात घेतले. स्वकीयांचा बंदोबस्त करीत परकीयांशी सामना केला. अफजलखान, शाहीस्तेखान, सिद्दी जौहर, मिझ राजे जयसिंग यांच्या रुपाने शिवरायांवर आणि स्वराज्यावर अनेक संकट आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली.

     रयतेच्या सुखासाठी आणि भक्कम स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी १६७४ मध्ये राज्याभिषेक करवून घेतला. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा स्फूर्तिदाता राजा, मातृभक्त-पितृभक्त राजा, साधुसंतांचा आदर करणारा राजा, दूरदृष्टी लाभलेला लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तित्त्वाचे कितीतरी पैलू आहेत.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.