II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:44:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           निबंध क्रमांक-8
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                  छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     महाराष्ट्रातीलच नव्हे तर उभ्या भारतातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरोखर असा लोकोत्तर पुरूष युगायुगातून क्वचितच जन्माला येतो.

     आज शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्षांचा काळ लोटलेला असला तरी ह्या मराठी राज्याच्या संस्थापकाला कुणी विसरू शकलेले नाही.

     त्यांचा जन्म १६२७ किंवा १६३० ह्या साली पुण्याजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पिता शहाजी राजे हे प्रथम निजामाच्या आणि नंतर आदिलशहाच्या दरबारातले सरदार होते. त्यांची आई जिजाबाई अत्यंत कर्तृत्ववान आणि खंबीर स्त्री होती. त्यांनी शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न पेरले. दादोजी कोंडदेव ह्या महान गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी शिक्षण घेतले. त्या शिक्षणात सैनिकी शिक्षणही होते.

     लहान वयातच त्यांना आणि जिजाबाईंना पुण्याची जहागीरदारी देऊन शहाजींनी पुणे येथे पाठवले. त्या काळात पुणे उजाड आणि निर्जन होते. जिजाबाईंनी ते पुन्हा वसवण्यासाठी शिवबांना उत्तेजन दिले.

     वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजीने आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर काही काळातच त्याने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

     शिवाजीराजांच्या पूर्वीही बरेच राजे होऊन गेले आणि त्यांच्यानंतरही बरेच राजे झाले. असे असताना शिवाजी महाराजांचे नाव अजूनही का घेतले जाते? त्यामागचे कारण हेच आहे की त्यांचे राज्य हे जनतेला आपले राज्य आहे असे वाटत होते. शिवाजीने जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले. लोकांवर अन्याय करणा-यांची कधीही गय केली नाही. मग तो कितीही मोठा तालेवार असो. अक्षरशः शून्यातून त्यांनी राज्यनिर्मिती केली. अत्याचारी यवनी सत्तेविरूद्ध उभे राहाण्याची हिंमत लोकांमध्ये निर्माण केली. ते शूरवीर होतेच परंतु प्रसंगावधानी पण होते. अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाचा पराभव ह्या प्रसंगातून ते दिसून येते. त्यांनी पार दिल्लीच्या औरंगजेबाचीसुद्धा झोप उडवली होती. आग्र्याहून सुटका ह्या ऐतिहासिक घटनेतून त्याची साक्ष मिळते.

     राजांपाशी गुणग्राहकता होती, त्यांच्या मनात अन्यधर्मीयांबद्दल द्वेष नव्हता. कित्येक मुसलमान सैनिक आणि अधिकारी त्यांच्या सैन्यात होते. स्त्रियांविषयी त्यांच्या मनात पराकोटीचा आदर होता म्हणूनच कल्याणचा खजिना ताब्यात घेतला तेव्हा मुसलमान सुभेदाराच्या सुनेला त्यांनी साडीचोळी देऊन परत पाठवले.

     ५ जून १६७४ रोजी शिवरायांनी रायगडावर राज्यारोहण केले. स्वतःच्या नावाचे नाणे विनिमयासाठी निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात एकुण तीनशे गड आणि किल्ले होते. लढाईच्या धामधुमीत गरीब जनतेला त्रास होऊ नये म्हणून राजे किती दक्ष होते हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून दिसून येते.

     अशा ह्या न्यायप्रिय, कल्पक, गुणग्राहक, दूरदर्शी, प्रसंगावधानी आणि शूरवीर राजाचा मृत्यू ३ एप्रिल, १६८० रोजी झाला खरा परंतु कीर्तीरूपाने आजही ते आपल्यात आहेतच.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.