II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:28:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                             निबंध क्रमांक-9
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                  छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     'शिवाजी' या महामंत्रातच महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे. या तीन अक्षरात पराक्रम आहे. निष्ठा आहे, शिस्त आहे, जिगर आहे. चिवट, प्रखर, ज्वलंत व रसरशीत राष्ट्रीय अस्मिता आहे. होय 'शिवाजीमहाराज' हे शब्द त्यांचं जीवनचरित्र सर्व मराठी माणसाला प्रेरक व स्फुरक आहे. अभिमानानं छाती भरून यावी, मान ताठ व्हावी असं महाराष्ट्राला ललामभूत झालेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे 'छत्रपती शिवाजीमहाराज'!

"शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।"

     रामदास स्वामींनी पुढील पिढ्यांना संदेश देताना शिवाजीमहाराजांबद्दल हे गौरवोद्गार काढले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा श्री गणेशा करणाऱ्या शिवाजीमहाराजांचे जीवन अलौकिक आहे.

     'झाले बहू होतील बहू, परंतु या सम हा।' असे वर्णन ज्यांना तंतोतंत लागू पडते ते म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज ! आज त्यांना जाऊन ३४० वर्षे झाली. तरीही त्यांच्या कर्तृत्वाचा डंका कालप्रस्तरावर गाजत आहे. यातच त्यांची थोरवी' आहे.

     शहाजी राजे भोसले व जिजाबाई यांच्या पोटी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर या सुपुत्राचा जन्म झाला. महाराष्ट्राला त्याचवेळी स्वराज्याचे स्वप्न पडले अन् जिजाऊच्या शिवबाने उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मातेचे, जनतेचे आणि राष्ट्राचे स्वप्न पूर्ण केले.

     शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाही यांचे राज्य होते. ते राजे श्रीमंत असले तरी मनाने उदार नव्हते. रयत सुखी नव्हती. रयतेला खायला पोटभर अन्न नव्हते. रहायला सुरक्षित निवारा नव्हता. आयाबायांची अब्रू सुरक्षित नव्हती. सगळीकडे अन्याय माजला होता. अशा परिस्थितीला त्रासलेल्या जिजाऊने काही निश्चय केला आणि बाळ शिवाजीला घडविण्याचा पवित्रा घेतला. त्या शिवबांना जवळ घेत. रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. साधू संतांच्या गोष्टी सांगत. यामुळे पराक्रम आणि आदर बुद्धी, स्वाभिमान आणि दयाळूपणा यांचे बाळकडू पीत शिवराय मोठे झाले.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.