II होळी II-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, March 17, 2022, 01:35:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            II होळी II
                                          लेख क्रमांक-5
                                         ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार आहे. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                     होलिका दहन (Holika Dahan)---

     संपूर्ण भारतात या सणाला होलिकादहन केलं जातं. मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जातं. यासाठी घरोघरी छोटी अथवा सार्वजनिक ठिकाणी लहान मोठ्या होलिका उभारल्या जातात. गावकरी एकत्र येऊन प्रार्थना, मंत्रोउच्चारात होलिकेचं दहन करतात. कोकणात होलिका दहन केल्यावर बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीत नारळ अर्पण करून तिला नैवेद्य दिला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी काही तरबेज गावकरी जळत्या होलिकेत हात घालून तो नारळ काढतात. अग्निदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होलिकादहन केलं जातं. वसंत ऋतूच्या आगमनामुळे या काळात वातावरणात थंडावा निर्माण झालेला असते. होलिका दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

                       धुलीवंदन (Dhulivandan)---

     होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात धुळवड अथवा रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते. यामागे सर्वांनी एकत्र येणे हा उद्दिष्ट असतो. रंग हे आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असतात. म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. नाच, गाणी आणि रंग खेळून सगळीकडे धुळवड साजरी केली जाते.

                            भांग खाण्याची प्रथा---

     भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची प्रथा आहे. भांग एकमेकांना देऊन त्यांची मजा घेणं हा या मागचा उद्दिष्ट असतो. भांग घेतल्यानंतर लोकांच्या वागण्याबोलण्यावरचं नियंत्रण सुटते. ज्यामुळे जाणिवपूर्वक इतरांना भांग देऊन त्यांची मजा घेतली जाते. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असतो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करताना भांग घेण्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

                 होळी का साजरी करतात (Why We Celebrate Holi)---

     होलिका दहन यावरून या सणाला होळी हे नाव पडले असावे. या सणाबाबत इतिहासात अनेक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र विशेष म्हणजे लहान मुलांना त्रास देणाऱ्या होलिका, ढुंढा आणि पुतना या राक्षसींचे दहन ही यामागे सांगितली जाणारी प्रसिद्ध कथा आहे. या पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने पाठवलेल्या होलिकेचा श्रीविष्णूने वध केला होता. या कथेनुसार होलिकेला वर मिळाला होता की तिला कोणताही अग्नी जाळू शकणार नाही. म्हणूनच भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेने त्याला मांडीवर घेत अग्निकुंडात प्रवेश केला होता. विष्णूच्या प्रभावामुळे भक्त प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिकेचे दहन झाले. ज्यामुळे दरवर्षी या सणाला होलिका दहन केले जाते. या मागे अनिष्ट गोष्टींवर मात करत इष्टाकडे मार्गक्रमण करणे हा हेतू आहे.

--तृप्ती पराडकर
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.03.2022-गुरुवार.