II रंगपंचमी II-निबंध क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:08:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II रंगपंचमी II
                                          निबंध क्रमांक-4
                                         ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                    रंगपंचमी निबंध---

     रंगपंचमी हा सण साजरा करताना लहान मुलांसह मोठ्यांनाही मज्जा येते. रंगांची उधळण करताना मुक्त क्षणांची जाणीव होत राहते. अशा रंगपंचमी सणाबद्दल विद्यार्थ्यांना रंगपंचमी हा निबंध लिहावा लागतो.

                      रंगपंचमी खेळताना...

     होळी, धुलवड आणि रंगपंचमी हे सण महाराष्ट्रात विविध दिवशी साजरे केले जातात. त्यातील रंगपंचमी हा दिवस म्हणजे रंगांचे, विविधरंगी जीवनाचे आणि आनंदाचे प्रतिकच आहे. या दिवशी सर्वजण पिचकारी, रंगांनी भरलेले फुगे, कोरडे रंग आणि रासायनिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करतात.

     रंगपंचमीला खूप पौराणिक संदर्भ आहे. भगवान श्री कृष्ण हे स्वतः रंगपंचमी खेळतात, असे वर्णन आहे. गोपिकांना रंग लावणे आणि त्यांना त्रास देणे हा एक प्रकारे खेळच त्यांनी खेळला होता. राधा व कृष्ण हे प्रतिक स्वरूप म्हणूनच रंगपंचमीला पुजले जातात.

     हिंदी आणि मराठी चित्रपटात अनेकवेळा होळीची, रंगपंचमीची दृश्ये दाखवली जातात. त्यावर नृत्यसंगीताचा आविष्कार दाखवला जातो. प्रत्येक पिढीत एखादे तरी गाणे सुप्रसिद्ध होत असते. ऐन रंगपंचमीला एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर अशी गाणी हमखास चित्रित केली जातात.

     प्रत्येक पिढीसाठी रंगपंचमी हा सण वेगवेगळा असू शकतो. शाळेतील मुले, लहान मुले ही धावत पळत, पिचकारी घेऊन, रंग संपले तर पाणी देखील एकमेकांवर ओतून हा सण साजरा करतात. महाविद्यालयीन मुले-मुली कोरड्या रंगांचा वापर करणे जास्त पसंत करतात.

     आज मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता रंगपंचमी हा सण देखील सोशल झाला आहे. वास्तविक खेळण्याचा आनंद मिळेल की नाही ते माहीत नाही पण स्टेटस मात्र महत्त्वपूर्ण झाला आहे. त्यासाठी रंगांची दोन बोटे गालावर उठवून खूप लोक मस्तपैकी फोटो अपलोड करत राहतात.

     रासायनिक रंग हे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा रंग वापरतो, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात खूप प्रकारचे रंग उपलब्ध असतात. नैसर्गिक पद्धतीने, कोणतेही रसायन न वापरता बनवलेले रंग सर्वांनाच उपयुक्त ठरतील आणि त्यांचा मानवी आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही.

     रंगपंचमी हा खेळ महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्या दिवशी खेळला जातो. काही ठिकाणी याची पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होते. असे असले तरी सर्वत्र मांगल्याचे, उत्सवाचे वातावरण मात्र असते. रंग खेळणे हा अति संवेदनशील मनाला भुरळ घालणारा सण आहे.

     रंगपंचमी दिवशी कोणीही कोणाला रंग लावला तरी चालते. त्या दिवशी वाईट वाटून घ्यायचे नसते. एकमेकांचा रंग प्रिय व्यक्तींवर बरसला पाहिजे आणि त्यामुळे आनंद व उल्हास हा प्रत्येक वर्षी वाढत गेला पाहिजे अशी त्यामागची भावना असते.


--by मराठी ब्लॉगर
------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डेली मराठी न्यूज.कॉम)
                -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.