लोकमत सखी-मीच ती-प्रसूतीप्रश्न-अ

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 08:14:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     >आरोग्य > प्रसूतीप्रश्न > गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा 'गरजेचंच' असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

     गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा 'गरजेचंच' असतं? का काढावं लागतं गर्भाशय? गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात, तेव्हा त्याची नेमकी काय कारणं असतात? कधी ते टाळता येतं, कधी काढून टाकणंच अपरिहार्य होतं?

     why and when hysterectomy necessary? what you should know - गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा 'गरजेचंच' असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

     गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे hysterectomy. बऱ्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे.

     पुन्हा एकदा तोच थकलेला, फिकुटलेला चेहरा... वय ४५ ते ५० च्या मध्ये..
'डॉक्टर, एक महिन्यापासून ब्लीडिंग होतंय. कालपासून अजूनच वाढलंय. पोटातही दुखतं सारखं.. थकून गेलीये हो मी!!'
पेशंटच्या डोळ्यात पाणी होतं.
मी पेशंटच्या नवऱ्याकडे बघून म्हटलं, "अहो, पण गेल्यावेळी आपलं याबद्दल बोलणं झालं होतं.. यांना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याबद्दल काय विचार केलाय तुम्ही?"
पेशंटचा नवरा हताशपणे म्हणाला, "मॅडम, अजून दोन डॉक्टरांनी पण हिला हेच सांगितलंय.. आम्ही सगळे समजावून थकलो.. पण ही ऑपरेशनसाठी तयारच होत नाहीये. हिच्या या सततच्या आजारपणाने मी आणि मुलं पण कंटाळून गेलो आहोत!"
प्रसंग २
३७ वर्षाची पेशंट नवऱ्याबरोबर सर्व तयारीनिशी आलेली. "डॉक्टर, मला आता ही कटकट नकोय.. काढून टाकायची आहे मला ही गर्भपिशवी.. सारखं अंगावरून पांढरं जातंय."
मी - "अग, तुला या ऑपरेशनची अजिबात गरज नाहीये.. तुझं वय खूप कमी आहे आणि साध्या औषधोपचारांनी तुझा त्रास कमी होऊ शकतो. ऑपरेशनचा हट्ट बरा नाही." अशा सल्ल्यानंतर दुर्दैवाने या पेशंट्स कधीकधी दुसरीकडे जाऊन ऑपरेशन करून घेतात.

     बघितलात ना हा आश्चर्यचकित करणारा विरोधाभास? सध्याच्या आपल्या समाजातल्या स्थितीबाबत हे निखळ सत्य आहे. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे hysterectomy. बऱ्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे. याची खरोखरच आणि नितांत गरज असलेल्या स्त्रिया वर्षानुवर्षे दुखणं अंगावर काढतात आणि अजिबात गरज नसलेल्या स्त्रिया विशेष करून ग्रामीण भागात सर्रास ही शस्त्रक्रिया करून घेताना दिसतात. म्हणून ठरवलं की आज जरा hysterectomy बाबत माहिती घेऊया.
कोणत्या प्रकारच्या केसेसमध्ये ही शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते हे समजून घेण्याची गरज आहे. या शस्त्रक्रियेला असलेले पर्याय आपण नंतर बघणारच आहोत.

     १) गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला (cervix) झालेली किंवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण.

     आपल्या देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या बाबतची तपासणी खरंतर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून दरवर्षी स्त्रीने करून घेणे अपेक्षित आहे मात्र भारतातील स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळ जवळ कधीच केली जात नाही. चाळीशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे असे त्रास सुरू झाल्यावरच त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात. अशा वेळी कॅन्सरच्या निदानासाठी HPV + LBC यासारख्या अचूक तपासण्या करता येतात. या तापसण्यांमध्ये कॅन्सरचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया ताबडतोब करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी चाल ढकल अजिबात न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला ऐकणे आणि शस्त्रक्रिया करून घेणे हेच पेशंटच्या हिताचे असते.

     २) फायब्रॉइड च्या खूप मोठ्या बऱ्याच गाठी असतील तर.

     फायब्रॉईड च्या गाठी कॅन्सर च्या शक्यतो कधीच नसतात पण त्या ५ सें.मी. च्या वर ,संख्येने जास्त आणि गर्भाशयाच्या मध्यभागी असतील तर खूप त्रासाच्या ठरु शकतात.अशा केसेस मध्ये अनियमित आणि अतिरक्तस्राव दिसून येतो.बऱ्याच वेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येते आणि मग रक्त भरून लगेच ऑपरेशन करणे भाग पडते.ही वेळ येऊ नये यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक आहे.एखाददुसरी गाठ असेल तर फक्त गाठ काढून गर्भाशय तसेच ठेवता येऊ शकते पण हे स्त्रीरोगतज्ज्ञ च ठरवू शकतात.

     ३) हॉर्मोन्स च्या असंतुलनामुळे सुद्धा अनियमित अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.

     पेशंट तरुण असेल तर हॉर्मोन्स च्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो पण पेशंटचे वय 40 च्या जवळ असल्यास हॉर्मोन्स च्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात आणि मग काही वेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.अशावेळी आधी क्युरेटिंग करून बायोप्सी घेतली जाते आणि त्यावर निर्णय घेतला जातो.कॅन्सरची शक्यता आहे असे वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.

--डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
(लेखिका पुणेस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
--------------------------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकमत सखी-मीच ती)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.