लेख संग्रह-हेमलकशातली पहिली पावलं-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:21:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "हेमलकशातली पहिली पावलं"
                                        लेख क्रमांक-१
                              ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     हेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द डॉ.प्रकाश आमटे.

     "समकालीन प्रकाशना'तर्फे लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील निवडक भाग.

     1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, ""आपण भामरागडला जाऊया." आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.

     बाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.

     या काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.

     शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, ""तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा? त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली ! मी चट्‌कन त्यांना म्हणालो, "या वयात तुम्ही हे कसं करणार? मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो." बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते खूप खूष झाले.

     अर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय!

     अर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्यक्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.

     हा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, ""बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, ""आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो." प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच! या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.

हेमलकशातली पहिली पावलं – डॉ.प्रकाश आमटे
शब्दांकन - सीमा भानू
------------------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लेख संग्रह.वर्डप्रेस.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.