मला आवडलेला लेख-विश्वास ठेवा-ब

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:44:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मला आवडलेला लेख"
                                    ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मला आवडलेला लेख, या लेख-मालिका विषया-अंतर्गत आज वाचूया एक विशेष लेख- "विश्वास ठेवा"

     विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेर जसे असतात, तसे काही व्यक्तिमनातही असतात. आपल्या परिसरातील घटकांना सर्व व्यक्ती सारख्याच पद्धतीने प्रतिक्रिया देत नाहीत. व्यक्तीचे वय, तिची मानसिक वाढ, तिचा अनुभव, तिच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वता अशा अनेक घटकांवर त्या – त्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. त्यामुळे विविध व्यक्तींच्या विश्वासांचे जगही वेगवेगळे असते. उदा., आईवडील, शिक्षक ह्यांची मते लहान मुले चिकित्सा न करता खरी म्हणून विश्वासाने स्वीकारतात. त्याचप्रमाणे विचार करण्याची जबाबदारी टाळणारे काही प्रौढही इतर जे काही सांगतात, ते सर्व विश्वासार्ह मानून त्यांच्या मतांवर विश्वासाने अवलंबून राहतात. मानसिक रूग्णांच्या मनात वस्तुस्थितीशी विसंगत अशा प्रकारचे अनेक विश्वास निर्माण होतात. तथापि ह्या प्रकारच्या विश्वासाला संभ्रम ही संज्ञा योग्य ठरते. काही मनोविकृत स्वतःला राजा, सर्वसत्तावंत, परमेश्वर मानतात. तर काही मनोरूग्ण स्वतःला पापी, गुन्हेगार समजतात.

     विश्वास ठेवणे आणि शास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध झालेल्या वस्तुस्थितीचा स्वीकार करणे ह्यांत फरक करावा लागेल. उदा., 'पृथ्वी गोल आहे, ह्यावर माझा विश्वास आहे' असे म्हणणे चमत्कारिक ठरेल.'विश्वास' हा वाय-फायसारखा असतो. दृष्टीस पडत नाही, दिसत नाही, पण तो तुम्हाला जे पाहिजे आहे, त्याच्याशी जोडून देतो. विश्वास म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्याला कधीही फसविणार नाही, आपले वाईट चिंतणार नाही, करणार नाही, आपल्याशी नेहमी प्रामाणिक असेलही त्या व्यक्तीविषयीची भावना म्हणजे 'विश्वास'. ती व्यक्ती आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रीण, नातेवाईक कोणीही असू शकते. अगदी नोकरसुद्धा. आपल्याला असलेली एक वाईट सवय म्हणजे, घरातील एखादी अगदी क्षुल्लक वस्तू जरी सापडत नसेल तर ती नोकराने उचलली असेल, हा संशय मनात प्रथम येऊन जातो. ते बरेचदा खोटे ठरते. एका अतिश्रीमंत कुटुंबात सरूमावशी अठरा एकोणीस वर्षे काम करत होती. आपल्या चार वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन काम शोधणाऱ्या सरूला या कुटुंबाने काम दिले, थारा दिला. सुरुवातीला तिच्यावर प्रत्येक जण लक्ष ठेवून असायचा. अनोळखी बाई काय करेल याचा नेम नाही, हाच विचार असायचा. सरूची सरूमावशी झाली ती, इतके प्रेम तिने सर्वाना दिले. अंग मोडून काम केले. घर सर्व दृष्टीने सांभाळले. मालकांनी पण तिच्या मुलाला शिकवले. हळूहळू व्यवसाय शिकवला. सगळं काही छान सुरू असताना कपाटातील काही दागिने नाहीसे झाल्याचे घरातील सुनेच्या लक्षात आले. सरूमावशीची चौकशी झाली, पण तिने दागिन्यांना हात लावला नाही याची सर्वाना खात्री होती. कोणीही तिच्यावर अविश्वास दाखविला नाही. दागिने कोणी नेले असतील हे तिनेच घरच्यांना सांगितले. सगळे अवाक्झाले. तरी चोर सापडायलाच हवा होता म्हणून अचानक संशयित व्यक्तीची झडती घेतली. तिने खूप आकांडतांडव केले. 'माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमचा सरूवर आहे' वगैरे बोलून रडारड केली. दागिने तिच्याकडे सापडले. 'तुम्ही माझ्याबरोबर मुलाचे आयुष्य घडविले, तुमचा विश्वासघात मी जिवावर बेतले तरी करणार नाही,' असे बोलून सरुमावशींनी सर्वाची मने परत एकदा जिंकली.

     एका रोग्याचा डॉक्टरांवरचा विश्वास वेगळाच असतो. एका रुग्णाची शस्त्रक्रिया होती. महिनाभर उपचार झाल्यानंतर शस्त्रक्रियेकरिता फिट असलेला तो रोगी आयत्या वेळी ढेपाळला. त्याला नैराश्य आले. 'ऑपरेशन करताना मी मरून जाईन' असे म्हणू लागला. शल्यचिकित्सकाने त्याचा हात धरला. डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, 'मी आहे. मनातील वाईट विचार काढून फेक.' या एका वाक्याने जादू केली. रुग्ण म्हणाला, 'मला या स्टेजपर्यंत यशस्वीपणे आणलंत, पुढे नक्कीच न्याल.' रोगी ठणठणीत बरा झाला हे सांगायला नकोच!

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी-अनलिमिटेड.इन आर्टिकल्स)
            --------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.