महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स-श्री.शैलेन्द्र तनपुरे-ब

Started by Atul Kaviraje, August 17, 2022, 08:01:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स"
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स" या ब्लॉग सदरात, श्री.शैलेन्द्र तनपुरे यांचा लेख.

शैलेन्द्र तनपुरे--
शैलेन्द्र तनपुरे हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक-जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक असून गेली ३२ वर्षे मराठी पत्रकारितेत आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दशकात आमूलाग्र बदल झाले. या नव्या बदलांचे तनपुरे साक्षीदार असून राज-का-रण या सदराद्वारे त्यांनी शहरातील राजकीय प्रवाहाची स्पंदने टिपली आहेत.
--------------------------------------------------------------------------

जगी सर्व सुखी असा कोण आहे?
शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण - राजकारण, सामाजिक
-----------------------------------------------

     महाविकास आघाडी सरकारनेही या भागाला झुकते माप दिले होते. दादा भुसे, गुलाबराव पाटील, बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे अशा सहा जणांना संधी देताना, आघाडी सरकारने नगर जिल्ह्याचे अंमळ अधिक लाड केले. हे सुख या वेळी जळगावच्या वाट्याला आले. पाडवींची जागा विजयकुमार गावितांनी घेतली. दोन्ही सरकारमध्ये धुळे जिल्हा कोरडाठाक राहिला. सुरूपसिंह नाईक, माणिकराव गावित व चंद्रकांत रघुवंशी या तत्कालिन प्रस्थापित काँग्रेस नेत्यांना आ‌व्हान देत, डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याचे सत्ताकारण ताब्यात घेतले, त्यालाही जमाना झाला; पण शहरातील रघुवंशींच्या साम्राज्याला त्यांना धक्का पोहोचवता आला नव्हता. आता त्यांचे कट्टर विरोधक चंद्रकांत रघुवंशी यांनीही शिवसेनेला ठेंगा दाखवून शिंदेगट जवळ केल्याने, एकाच जिल्ह्यातील या दोन तल‌वारी एका म्यानात कशा राहतील, हे पाहणे रंजक ठरावे. गावित यांच्या बरोबरीने तेव्हा अॅड. के. सी. पाडवी व अॅड. पद्माकर वळवी या उच्चशिक्षित आदिवासी नेत्यांनाही समाजाने साथ दिली. काँग्रेसनेही त्यांना मोठे केले. गावितांनी अपक्ष, राष्ट्रवादी व नंतर भाजप असा प्रवास करीत जिल्ह्यावरील आपला प्रभाव सातत्याने वाढवत नेला. त्याचमुळे त्यांची कन्या डॉ. हीना यादेखील दोनदा लोकसभेवर जाऊ शकल्या. आदिवासी आश्रम शाळेतील सहा हजार कोटी रुपयांच्या खरेदी घोटाळ्यात गावित अडकल्याने त्यांना विजनवासात जावे लागले; मात्र त्यांची जनमानसावरील पकड कायम राहिली, त्याचे फळ आता मिळाले. हीच गत जळगावमधील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांची. तेथे शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे इतर आमदार व गुलाबरावांच्या मधुर संबंधाचाही विषय आहेच. महाजन त्यांच्या पक्षात एकमेव धनी असल्याने त्यांना तशी फिकीर नाही. गावितांप्रमाणेच विखेंचेही चिरंजीव खासदार आहेत. महाजन यांच्या सौभाग्यवती जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या घराणेशाहीवर तुटून पडणाऱ्या भाजपला हे असले चालते; कारण अशी संस्थाने सांभाळणे ही त्यांची अगतिकता आहे.

     अशा स्थितीत नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपैकी तीन आमदार शहरातील असताना एकालाही मंत्रिपद मिळाले नाही. शहरातील तिघांबरोबरच ग्रामीणमधीलही एका आमदाराने पालिकेच्या सत्तेचा अनुभव घेतला आहे. असे असतानाही या सर्वांना 'वेटिंग'ला ठेवून पक्षाला नेमके काय साधायचे आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. राज्यात पुन्हा सत्ता आली, तरी अशा लहानसहान सत्तांमध्येही जीव अडकलेला असतो. शेवटी सत्तेच्या या उतरंडी हीच खरी ताकद असते. सुखाची परिभाषा व्यक्तिनिहाय बदलते हे खरेच; पण संत तुकाराम महाराज म्हणतात तसे, 'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' हेच शेवटी खरे अन् शाश्वत नाही का? राजकारण्यांना ही परिभाषा समजेल तो सुदिन.

--शैलेन्द्र तनपुरे
Shailendra.Tanpure@timesgroup.com
------------------------------------------

        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ब्लॉग्स.महाराष्ट्र टाइम्स.इंडिया टाइम्स.कॉम)
       ---------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2022-बुधवार.