इंद्रधनुष्य-मध्यरात्रीनंतरचे तास-अ

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 08:02:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "इंद्रधनुष्य"
                                        -----------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सदर "इंद्रधनुष्य" मध्ये, एका पुस्तकाचा परिचय. या पुस्तकाचे नाव आहे-  "मध्यरात्रीनंतरचे तास"

                         इंद्रधनुष्य--
     वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... !!!--पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका – सलमा, अनुवाद – सोनाली नवांगुळ)

     पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)

     सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.

     त्यांना लहानपणापासून वाचन, कविता यांची आवड होती. त्यांनी मिळेल त्या कागदावर, जमेल तशा कविता करायला सुरुवात केली. ते कागद घरच्या मोठ्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून त्या कागदांच्या बारीक घड्या घालून लपवून ठेवत असत. काही काळाने त्यांच्या आईला हे समजलं. आईनं या बाबतीत मुलीच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं आणि लपूनछपून ते कागद कुणा ओळखीच्यांकडे सोपवले. त्यांनी आणखी कुणा जाणकाराला ते दाखवले. त्या कविता पठडीबाहेरच्या, वेगळ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. करता करता कवितांचा एक संग्रह प्रकाशित करण्याचं ठरलं.

     दरम्यान इकडे सलमा यांचं लग्न झालं. त्यांच्या सासरी सुद्धा तसं कर्मठ वातावरणच होतं. स्वतःच्याच कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला त्या लपूनछपून गेल्या. कार्यक्रमाच्या जागी त्यांनी आपली ओळख जाहीर केली नाही. प्रेक्षकांमध्ये मागे कुठेतरी बसून कार्यक्रम पाहिला आणि त्या गुपचूप घरी निघून गेल्या.

     त्यांची खरी ओळख उघड झाली तेव्हा आधी घरच्यांचा प्रचंड विरोध त्यांना सहन करावा लागला. पुढे हा विरोध मावळला. त्या स्थानिक राजकारणात उतरल्या. गावच्या सरपंच झाल्या.

     आजपर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह, एक लघुकथासंग्रह, एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशा-परदेशांत त्यांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित केले गेले आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'सलमा' हा इंग्रजी लघुपट २०१६ साली सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सादर झाला. पुढे या माहितीपटालाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

     २०१९ साली जयपूर लिट-फेस्टमध्ये सलमा आल्या होत्या. त्या वर्षीच्या लिट-फेस्टवर आधारित एक लेख 'अनुभव' अंकात  प्रकाशित झाला. त्या लेखामुळे मला सलमा यांच्याबद्दल समजलं. मी नेटवर त्यांच्याबद्दल मिळेल ती माहिती शोधून वाचली. (तशी फार नव्हतीच.)

--तमिळ लेखिका–सलमा
--अनुवाद–सोनाली नवांगुळ
------------------------
(August 13, 2022)
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-माझ-इंद्रधनुष्य.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                   (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार.