इंद्रधनुष्य-मध्यरात्रीनंतरचे तास-ब

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 08:05:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           "इंद्रधनुष्य"
                                          -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सदर "इंद्रधनुष्य" मध्ये, एका पुस्तकाचा परिचय. या पुस्तकाचे नाव आहे-  "मध्यरात्रीनंतरचे तास"

                         इंद्रधनुष्य--
     वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात येणाऱ्या विविध विचारांचं हे इंद्रधनुष्य .... !!!--पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका – सलमा, अनुवाद – सोनाली नवांगुळ)

     'मध्यरात्रीनंतरचे तास' हा त्यांच्या तमिळ कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद. २०२१ साली सोनाली नवांगुळ यांना या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. म.टा.च्या फेसबुक पेजवर सोनाली नवांगुळ यांची मुलाखत मी पाहिली आणि हे पुस्तक विकत घेण्याचं ठरवलं.  पुस्तकापर्यंतचा हा माझा वैयक्तिक प्रवास मला कुठेतरी नोंदवून ठेवायचा होता. म्हणून इथे लिहिलं. वाचनामुळे एकातून एक माहिती कळत जाते, त्याचा माग काढला जातो, त्यातून काही ना काही नवीन सापडतं, ही साखळीही माझ्या आवडीची. मात्र हा प्रवास जितका आवडता, तितकंच हे पुस्तक झाकोळून टाकणारं आहे.

     साडेपाचशे पानांची घसघशीत कादंबरी आहे. तामिळनाडूतल्या मदुराईजवळचं एक लहानसं गाव. गावात बहुसंख्य मुसलमान वस्ती. घरोघरी कर्मठ वातावरण. दैनंदिन आयुष्यातही स्त्रियांवर असलेली अनेक बंधनं. अशा भवतालातली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातली चार-सहा कुटुंबं, ८-१० वर्षं ते ६०-७० वर्षं वयोगटातली अनेक स्त्री-पात्रं; तुलनेनं मोजकी पुरूष-पात्रं, पण त्यांचा वरचष्मा, घराघरांमध्ये असणारी त्यांची जरब; त्यांच्यावर प्रेम-माया करणार्‍या, तरीही त्यांना दबकून असणार्‍या स्त्रिया; परंपरेच्या पगड्याखाली प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारे पिचत जाणं; असा हा सगळा कादंबरीचा अंतिमतः भकास करणारा अवकाश आहे.

     कादंबरीतल्या अनेक स्त्रिया आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या पातळीवर लहान-मोठी ते सूक्ष्मातिसूक्ष्म बंडं करतात. त्यात होरपळतात. अनिश्चित भविष्याचं ओझं वागवतात. कथानकात त्या अनुषंगानं येणार्‍या लहानसहान गोष्टी लेखिकेनं आपल्या घरात अनुभवलेल्या असणार याचा वाचताना अंदाज येतो. कादंबरीतला काळ गेल्या ४०-५० वर्षांतलाच; फार काही जुना नाही. त्यामुळे तर भकासपणा आणखीनच वाढतो.

     अनुवाद उत्कृष्ट आहे. पुस्तक मूळ मराठीतूनच लिहिलेलं असावं असं वाचताना वाटतं. बर्‍याच दिवसांनी इतका सुंदर मराठी अनुवाद वाचायला मिळाला. तरीही वर म्हटलेल्या भकासपणामुळे (तसंच काही काही जागी ताणली गेलेली वाटल्यामुळे) ही कादंबरी वाचून संपवायला मला वेळ लागला.

     हे आपल्याच देशातल्या एका भागातलं कौटुंबिक चित्र आहे हे स्वीकारायला जड जातं. पण त्याचबरोबर अशी इतर आणखी बरीच चित्रं असतील, जी भाषांमधल्या अंतरांमुळे आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलीच नसतील, हे सुद्धा जाणवतं !

--तमिळ लेखिका–सलमा
--अनुवाद–सोनाली नवांगुळ
------------------------
(August 13, 2022)
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-माझ-इंद्रधनुष्य.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार.