चमनचिडी-गझलशाळेत डोकावताना

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:29:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "च'मन'चिडी"
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री मिलिंद लिमये, यांच्या "च'मन'चिडी" या ब्लॉगमधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गझलशाळेत डोकावताना"

                 गझलशाळेत डोकावताना--

     जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.

     पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून रंगांधळा झाल्याचा फील यायचा. निळं ऊन काय, सोनेरी पारवा काय, राजवरखी कावळा काय. बाय द वे हा राजवरखी का काय जो रंग आहे ना तो रंगांधळा नसूनही मला माहीत नाहीये. तर अशा ह्या परिस्थितीमुळे कवितेशी (म्हणजे कविता ह्या साहित्यप्रकाराशी) माझा काहीही संबंध नव्हता.

     ही अशी स्थिती गेली तीस पस्तीस वर्षं अबाधित असताना, एक दिवस अचानक फेसबुकवर एक पोस्ट दिसली. माझ्या फेसबुकवरच्या स्नेही अमिता पेठे पैठणकर यांची ती पोस्ट होती. त्यांनी लिहिलं होतं, दुकान इच्छांचे मी आवरले होते, आनंदाची सापडली लिमलेट मला...

     अरे वा, हल्लीचे कवी असंही लिहू शकतात तर? मला झालेला आनंद त्यांना कळवला. त्यातून असं कळलं की अशा अनेक कवी, कवयित्रींचा गझलशाळा नावाचा ग्रुप आहे. हे सर्व लोक गझल ह्या काव्यप्रकाराचा नीट अभ्यास करतात, चर्चा करतात व काहीतरी लेजिटिमेट लिहितात. अशा पंचेचाळीस गझलकारांच्या प्रत्येकी दोन याप्रमाणे नव्वद गझलांचा हा संग्रह म्हणजे 'गझलशाळा'.

     डोंगरपायथ्याच्या एखाद्या छोट्याशा खेडेगावातनं एखाद्या गडाकडे वाटचाल करताना कधीतरी अतिशय शिस्तबद्ध कवायत दिसते, कधी अटीतटीचा खोखोचा सामना दिसतो, कधी सुरेल आवाजात गायलेली कविता कानावर पडते आणि थोडी वाट वाकडी करून त्या शाळेत डोकवायचा मोह आवरत नाही. माझंही असंच झालं आणि मी ह्या 'गझलशाळेत' डोकावलो.

     अमिताताईंनी स्वहस्ताक्षरात त्यांच्याच एका गझलेतली ओळ लिहून एक प्रत मला पाठवलीय. शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान, अर्थपूर्ण गझल लिहिल्या आहेत. नव्वदचं आहेत, पण माझ्या अजून सगळ्या वाचून झाल्या नाहीयेत. काहीवेळा अर्थ समजून घ्यायला वेळ लागतोय, पण तो माझा दोष. त्यामुळे पूर्ण वाचन झाल्यानंतर ह्या शाळेसंबंधी तुम्हाला सांगायचा विचार बाजूला ठेवून आधीच हे लिहून टाकलं. इथे मला आवडलेल्या ओळी वानगीदाखल टाकायचा मोह आवरत नाहीये. पण त्याचा उद्देश केवळ तुमचं कुतूहल वाढावं हा आहे.

- हुज्जत घालत बसतो भाजीवाल्याशी, बस! लिहिताना सतावतो दुष्काळ मला (चैतन्य कुलकर्णी)
- मी तिच्या डोळ्यात बुडलो वाहवत गेलो, राहिले मग यायचे परतून काठावर (नेतराम इंगळकर)
- त्या फुलाचा स्वभाव फुलण्याचा, मात्र होते निमित्त चैत्राचे (समीर जिरांकलगीकर)

     ज्यांना कुणाला गझल करायला, वाचायला आवडतात, त्यांना चाली लावायला आवडतात, त्यांनी अवश्य ह्या गझलशाळेत डोकवावं. एखादी 'लिमलेट' निश्चितच सापडेल.

     गझलशाळेच्या सर्व सदस्यांचं मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूपसाऱ्या शुभेच्छा...

--© मिलिंद लिमये
(ऑगस्ट २१, २०२२)
------------------

                 (साभार आणि सौजन्य-च'मन'चिडी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.