जयंत कुलकर्णी-फ्रेंच राज्यक्रांती-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:35:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "जयंत कुलकर्णी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री जयंत कुलकर्णी, यांच्या "माझे मराठीतील लेखन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फ्रेंच राज्यक्रांती"

                        फ्रेंच राज्यक्रांती--(लेख क्रमांक-१)
                       ------------------------------

     सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले... तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे... त्यातील एक क्रांतीकारक डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie) हा माझ्या आवडत्या व्यक्तिरेखांपैकी एक. दुसरा आहे डॅन्टॉन. हे पुस्तक केव्हा पूर्ण होईल ते मला सांगता येणार नाही, परंतु ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्यातील कथा ऐकाव्या लागणार... 🙂 पुस्तक ७० % पूर्ण झाले आहे...पण अजून बरेच राहिले आहे..

     कॅमिली डिमुलाने त्याच्या पत्नीस, तुरुंगातून लिहिलेले शेवटचे निरोपाचे पत्र. दोन तीन दिवसांनी गिलोटीनखाली त्याचे शीर धडावेगळे होणार होते हे लक्षात घ्या. हे पत्र माझ्या पुस्तकातून घेतले आहे.

     १ एप्रिल सकाळी ८ वाजता.

     निद्रेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. एकदा माणूस झोपला की तो सगळ्या काळज्यातून मुक्त होतो. आपण बंधनाता आहोत हे तो विसरतो. ही माझ्यावर परमेश्वराने दयाच केली म्हणायची. काही क्षणापूर्वीच मी तुला स्वप्नात पाहिले. मी स्वप्नातच सगळ्यांना अलिंगन दिले. तुला, होरेसला आणि तुझ्या आईला. तुम्ही सगळे घरातच होता, पण आपल्या लहानग्याला त्या स्वप्नात जंतुंसंसर्गाने दृष्टी गमवावी लागली आणि झालेल्या अतीव दुःखाने मला जाग आली.

     मी परत माझ्या कोठडीत आलो तेव्हा पहाट उगवली होती आणि फटफटले होते. तू दिसली नाहीस आणि तुझे बोलणेही मला ऐकू न आल्यामुळे मी उठलो. म्हटले तुझ्याशी जरा बोलावे आणि नाही जमले, तर निदान काही लिहावे तरी., पण मी जेव्हा खिडकी उघडली तेव्हा मला सत्य परिस्थितीची जाणीव झाला आणि मी हताश झालो. या भिंती, दरवाजे आणि कड्याकुलपांनी आपल्यात कित्येक योजने अंतर निर्माण केलंय याची तुला कल्पना नाही. माझ्या मनाला आणि विचारांना प्रचंड निराशेने घेरले. मी माझ्या अश्रूत विरघळून गेलो. मी जिवंतपणी या माझ्या थडग्यात ओक्साबोक्षी रडलो. ल्युसिला! ल्युसिला! कुठे आहेस तू? काय करू मी?

     काल संध्याकाळी मी जेव्हा तुझ्या आईला उद्यानात पाहिले तेव्हाही मला असेच उचंबळून आले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. मी जमिनीवर कोसळलो. मी हात जोडले. जणुकाही मी तिच्याकडे क्षमेची भीक मागतोय. तिने तुला ही हकिकत संगितली असणार. माझ्याकडे पाहताना तिला रडू फुटले, पण मला तिचे अश्रू दिसू नयेत म्हणून तिने आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला. जेव्हा तू परत येशील तेव्हा तिला तुझ्या जवळ बसायला सांग म्हणजे मला तू पटकन दिसशील. त्यात काही धोका आहे असं मला वाटत नाही.

--जयंत कुलकर्णी.
(August 19, 2022)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-जयंत पुणे.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.