जयंत कुलकर्णी-फ्रेंच राज्यक्रांती-(लेख क्रमांक-4)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:41:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "जयंत कुलकर्णी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री जयंत कुलकर्णी, यांच्या "माझे मराठीतील लेखन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फ्रेंच राज्यक्रांती"

                      फ्रेंच राज्यक्रांती--(लेख क्रमांक-4)
                     ------------------------------

     ते मला हाका मारत आहेत. या क्षणी क्रांतीच्या न्यायालयाचे आधिकारी माझी चौकशी करण्यासाठी येणार आहेत. ते मला फक्त एकच प्रश्न विचारतील. काळजी करू नकोस. ते विचारतील, ''तू प्रजासत्ताकाच्या विरुद्ध कट कारस्थाने केलीस का?'' असे विचारून ते प्रजासत्ताकाचा अपमान करत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण मी स्वतःच प्रजासत्ताचे शुद्ध रूप आहे ! माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला जाणीव आहे. माझ्या ल्युसिलाचा, लोला आता मला निरोप दे! लाडके, माझ्या वडिलानाही मी त्यांची आठवण काढली आहे हे सांग. हा समाज कृतघ्न आहे, रानटी आहे. माणसाच्या कृतघ्नतेचे आणि रानटीपणाचे एवढे उत्तम उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. माझ्या आयुष्याचे अंतीम क्षण तुझा अपमान करणार नाहीत. माझी भीती साधार खरी ठरली आहे आणि माझे भाकीतही खरे ठरले म्हणायचे! मी एका स्वर्गिय गुण आणि सौंदर्य लाभलेल्या स्त्रीशी लग्न केलंय. मी आजवर एक चांगला पती, एक चांगला मुलगा होतो आणि मी एक चांगला बापही झालो असतो. ज्यांना स्वातंत्र्याची चाड आहे अशा सर्व प्रामाणिक रिपब्लिकन माणसांना आज माझ्याबद्दल वाईट वाटतंय, माझ्याबद्दल आदर वाटतोय. मी वयाच्या तिसाव्या वर्षी मरणार आहे, पण गेली पाच वर्षे, क्रांतीच्या अनेक कड्यावरून मी न पडता चाललो हे एक आश्‍चर्यच मानले पाहिजे. या क्षणी तरी मी जिवंत आहे.

     मी माझ्या आठ ग्रंथांच्या उशीवर आज शांतपणे माझे मस्तक ठेवून विसावलो आहे. त्यात मी जे विचार मांडले आहेत त्यातून मी माझ्या देशबांधवांना जुलुमी सरकारपासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय. सत्तेची धुंदी सर्व माणसांना चढते हे सत्य आहे. डेनिस सायराकुस म्हणतो ते यांच्या बाबतीत किती खरे आहे, ''जुलूम हा एक सुंदर एपिटाफ आहे''

     हे अभागी विधवे तू स्वतःचे थोडे सांत्वन कर, कारण तुझ्या गरीब बिचाऱ्या कॅमिलीचा एपिटाफ यापेक्षा कितीतरी चांगला आहे. त्याच्या थडग्यावरील ओळी जुलुमी सत्ताधीशांना ठार मारणाऱ्या ब्रुटस आणि कॅटोच्या थडग्यावरील ओळी आहेत. माझ्या प्रिय ल्युसिला! खरे तर माझा जन्म कविता लिहिण्यासाठी, दुःखी जनतेचे रक्षण करण्यासाठी, तुला आणि तुझ्या आईला सुखी ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्या वडिलांसाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी झाला होता. मी अशा प्रजासत्ताक देशाचे स्वप्न पाहिले होते ज्याचा सारे विश्व आदर करेल. माणूस एवढा अन्यायी आणि रानटी असेल असे मला मुळीच वाटले नव्हते. माझ्या लिखाणातील उपहासात्मक, बोचऱ्या विनोदाने किंवा टीकेने माझे कर्तृत्व झाकाळून गेले आहे असे मानणे मला वाटते बरोबर नाही, पण मला कल्पना आहे त्या उपहासाने माझा बळी घेतला आणि माझ्या डॅन्टॉनबरोबरच्या माझ्या मैत्रीचाही मी बळी आहे.. डॅन्टॉन आणि फिलिप या माझ्या मित्रांबरोबर मला ठार मारणार आहेत यासाठी मी माझ्या मारेकऱ्यांचे आभार मानतो.

--जयंत कुलकर्णी.
(August 19, 2022)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-जयंत पुणे.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.