जयंत कुलकर्णी-फ्रेंच राज्यक्रांती-(लेख क्रमांक-5)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:43:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "जयंत कुलकर्णी"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री जयंत कुलकर्णी, यांच्या "माझे मराठीतील लेखन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फ्रेंच राज्यक्रांती"

                      फ्रेंच राज्यक्रांती--(लेख क्रमांक-5)
                     ------------------------------

     माझे सहकारी इतके भेदरट निघतील असे मला वाटले नव्हते. त्यांनी कुठल्या कुठल्या अफवांवर विश्वास ठेवून मला वाऱ्यावर सोडले हे मला माहीत नाही, पण हे सत्य आहे की आम्ही मृत्यूला कवटाळतोय ते आम्ही मोठ्या धैर्याने देशद्रोह्यांवर टीका केली त्यासाठी आणि आम्ही सत्यावर प्रेम केलं म्हणून. आम्ही शेवटचे खरे प्रजासत्ताकवादी म्हणून मरणार आहोत याचे सारे जग साक्षी आहे.

     माझ्या प्रियतमे मला क्षमा कर. ज्या क्षणी आपण एकमेकांपासून दूर झालो, त्याच क्षणी खरेतर माझे खरे आयुष्य संपले. मी आता फक्त माझ्या आठवणींवर जगतोय. तुला विसरण्यापेक्षा स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवलेले बरे. माझी ल्युसिला, माझी लोला, मी तुला प्रार्थना करतोय, की मला हाका मारू नकोस. तू मला साद घालू नकोस कारण त्याने मी माझ्या थडग्यात छिन्नविछिन्न होतो. आपल्या लहानग्यासाठी काहीतरी करणे तुला भाग आहे. आता तुला आपल्या होरेससाठीच जगायचे आहे. त्याला माझ्याबद्दल सांग. इतर लोक सांगणार नाहीत ते सत्य त्याला सांग. मी असतो तर त्याच्यावर किती प्रेम केले असते ते त्याला सांगशील. माझ्यावर अत्याचार होत असले तरी देवाच्या अस्तित्त्वावर माझा विश्वास आहे. माझ्या रक्ताने माझ्या चुका धुतल्या जातील, माझी दुर्बलता धुतली जाईल आणि परमेश्वर माझ्या सदगुणांचा आणि माझ्या स्वातंत्र्यावरील प्रेमाचा गौरव करेल. प्रिये, लाडके एक दिवस मी तुला परत भेटेन! ल्युसिला, माझी ॲनेट! मी मृत्यूबद्दल संवेदनशील आहे, सगळेच असतात, पण मॄत्यू माझी सर्व अपराधांपासून सुटका करेल माझे दुर्दैव हाच माझा अपराध आहे.

     मी तुझा निरोप घेतो! लोला! माझ्या आत्म्या, माझे जिवन, या पृथ्वीतलावरील माझी स्वर्गदेवता, मी तुला माझ्या चांगल्या मित्रांच्या स्वाधीन करून जात आहे. ही माणसे सदाचारी आहेत, प्रामाणिक आहेत.

     होरेस, बाबा, ल्युसिला आता मी तुमचा कायमचा निरोप घेतो. माझ्या आयुष्याचा किनारा आता मला दूर जाताना दिसतोय. मला ल्युसिला तू अजून दिसतेस, माझी लाडकी ल्युसिला अजून किनाऱ्यावर माझा निरोप घेत उभी असलेली मला दिसतेय! माझ्या बांधलेल्या हातानी मी तुला मिठी मारण्याचा प्रयत्न करतोय. माझी तडफड होतेय आणि माझे निर्जीव डोळे तुला पाहण्याचा अजूनही प्रयत्न करत आहेत....

कॅमी..

     (रॉबेस्पिअर हा कॅमिली डिमुलाचा शाळकरी मित्र होता आणि शिवाय कॅमिलीचा मुलगा होरेस, त्याचा मानसपुत्र होता.)

मृत्यू :

     दुपारी अधिकारी त्याला गिलोटीनसाठी तयार करण्यासाठी आले. तो कोपऱ्यात अंग दुमडून बसला. एखादे चवताळलेले जनावर जसे आक्रमक होते, तसा तो त्या अधिकाऱ्यांशी झगडला. गिलोटीनला घेऊन जाण्यासाठी जी गाडी येते त्यात मृत्यूच्या वाटेवर असतानाही त्याने त्यांच्याशी झटापट केली. त्याला घोडदळाने, पायदळाने, तोफदळाने आणि नॅशनल गार्डच्या सैनिकांनी घेरले असताना त्याने त्याची बंधने तोडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे कपडे वैफल्यग्रस्त होऊन रागाने टराटरा फाडले. त्याने त्याची छाती, मान उघडी टाकली. त्याने जमलेल्या जमावाकडे मदतीची याचना केली ''तुमच्या मित्राला हे ठार मारणार आहेत! मला मदत करा.''

     कॅमिली डिमुलां! ८९ साली त्याने देशभक्तांना हातात बंदुका घेण्याचे आवाहन केले होते. आता जमलेल्या जमावाने त्याला साधी ओळख दाखवण्यासही नकार दिला. ज्या माणसांसाठी त्याने आपले आयुष्य खर्ची घातले ती माणसे आता त्याला वाचवणार का? त्याची झटापट पाहून एका सैनिकाने त्याला गाडीच्या तक्तपोशीला बांधून टाकण्याची धमकी दिली. त्या धमकीने तो शांत झाला आणि त्याने सभोवताली नजर फिरवली. मृत्यू त्याच्या इतक्या जवळ आलाय यावर त्याचा विश्वास बसेना. तेवढ्यात त्याची नजर गिलोटीनकडे गेली. गिलोटीनचे पाते मावळणाऱ्या सूर्याच्या लालसर प्रकाशात लालभडक दिसत होते. प्लेस द ल रेव्होल्युशनच्या चौकात जमलेल्या त्या प्रचंड समुदायामध्ये त्याची कृष आकृती मधोमध उठून दिसत होती. फारच केविलवाणे दृष्य होते ते! (या चौकाचे मूळ नाव होते कॉन्कॉर्ड चौक. जेव्हा या चौकात गिलोटीनखाली माणसे मारण्यात आली तेव्हा त्याचे नाव झाले रेव्होल्युशन चौक) त्याने तेथेही झटापट केली. तो प्रचंड घाबरला होता. जेव्हा तो गिलोटीनच्या पात्याखाली आला तेव्हा त्याच्या मित्रांच्या रक्ताने माखलेले ते पाते त्याला दिसले आणि तो एकदम शांत झाला. त्याचे आवसान परत आले. तो म्हणाला, ''स्वातंत्र्यलढा सुरू करण्यासाठी हे बक्षीस योग्यच आहे.'' मग त्या घरंगळत येणाऱ्या पात्याखाली त्याचे मुंडके उडले. त्याचा मृत्यू झाला, पण त्या क्षणापर्यंत तो स्वतःचा मालक होता. मरताना त्याने त्याच्या लाडक्या बायोकोच्या केसाची ती बट हातात घट्ट धरली होती...

     ल्युसिला आणि डिलॉन यांची मस्तके काही दिवसांने गिलोटीनखाली धडावेगळी झाली. या सगळ्या नाट्याचा उबग आलेली ल्युसिला मात्र अत्यंत धीराने, न डगमगता, मृत्यूला सामोरी गेली.

--जयंत कुलकर्णी.
(August 19, 2022)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-जयंत पुणे.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.