पाषाणभेदाची जालवही-लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:53:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "पाषाणभेदाची जालवही"
                                   ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, पाषाणभेद यांच्या "पाषाणभेदाची जालवही" या ब्लॉगमधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक--"

         लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक--(लेख क्रमांक-१)--

     आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. गेली २६ वर्षे ते सायकलीवर भटकंती करत आहेत. पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

     गेल्या गणपतीत त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. मी ही सायकल (कधीकधी) चालवत असतो. त्यामूळे त्यांना भेटायची उत्सूकता होती पण भेटण्याचा योग येत नव्हता. मागच्या शुक्रवारी ३१/१०/२००९ रोजी त्यांच्या घरी भेट घेतली. एक साधा सज्जन माणूस, ५ फुटाच्या आतबाहेर उंची, वयोमानानूसार केस पिकलेले, स्पष्ट आवाज असा हा माणूस. पण ज्या वयात आराम करायचा त्या वाढत्या वयात सायकलवर फिरलेला.

     त्यावेळी त्यांच्याशी घरगूती गप्पा झाल्या. त्या प्रश्नोत्तर स्वरूपातील गप्पांना मुलाखतीचे रुप दिले व ते आपल्यापर्यंत पोचवले. (त्यांचे काढलेले फोटो अजून जालावर चढवलेले नाहीत. उद्यापरवा चढवेलच त्या वेळी परत हा लेख पहा.)

पाषाणभेद: नमस्कार काका.

लक्ष्मण यादव अहिरे : नमस्कार.

पाषाणभेद: तुमच्याबद्दल काही सांगा ना.

लक्ष्मण यादव अहिरे : माझे नाव लक्ष्मण यादव अहिरे. माझा जन्म नाशिकला १२/११/१९३९ साली झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. आम्ही ४ भाऊ होतो. वडील मिलीट्रीत ड्रायव्हर होते. रहायला मल्हारखाण - अशोकस्तंभ, नाशिक येथे असतो. माझे शिक्षण ४ थी पर्यंत झालेले आहे. वयाच्या १७ वर्षी लग्न झाले. मला २ मुले व १ मुलगी आहेत.

पाषाणभेद: तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा ना.

लक्ष्मण यादव अहिरे : मी १३/१४ वयाचा होतो त्यावेळेपासुन छोटेमोठे कामे करायचो. त्यानंतर एका पिठाच्या गिरणीत जवळजवळ २५ वर्षे कामाला होतो. १९७५ साली मुंबई नाका येथे सायकलचे दुकान काढले. नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते. वसंत गीते तर मला 'मामा' म्हणतात. अशोकस्तंभावरचे माझे 'अशोकस्तंभ मित्र मंडळाचे' अध्यक्ष श्री. काळे यांनी माझ्या नावाच्या अद्याक्षराच्या पुढे 'जी ' लावून त्याचे 'लयाजी' अहिरे बाबा असे केले. त्यामूळे मला सर्व जण 'लयाजी अहिरे बाबा' असेच बोलवतात.

पाषाणभेद: आता आपण तुमच्या सायकल चालवण्याबद्दल बोलू. मला सांगा तुमची पहिली 'सायकल स्वारी' कधी घडली?

लयाजी : १९८२ साली मी व एक मित्र, थोरात जो एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, आम्ही दोघांनी सायकलवरून उजैनला जाण्याचा विचार केला. माझे सायकलचे दुकान होतेच. सायकलची आवड असल्याने 'इंधन वाचवा', 'राष्ट्रीय एकात्मता', 'शांतीचा संदेश' घेवून पहिली मोहीम आखली.

पाषाणभेद: प्रवासाची पुर्व तयारी कशी केली?

लयाजी : माझी जुनी अ‍ॅटलास सायकल होती. तिच्या मेड इन इंग्लंडच्या रिंगा एका मित्राने दिलेल्या होत्या. २२ इंचाची सायकल होती. कपडे, स्टोव्ह, जरूरीपुरता शिधा, १००० /१२०० रुपये, कंदील व सायकल रिपेरचे सामान (पान्हे, हवेचा पंप इ.) घेतले आणि निघालो.

पाषाणभेद: तुमचा मोहीमेतला दिनक्रम कसा असायचा?

लयाजी : आम्ही सकाळी दिवस उजाडला की निघायचो. कुठे १२/ १ वाजता थांबून नाश्टा-जेवण करायचो. बर्‍याचदा लोकं आम्हाला जेवण देत. दुपारी थोडं कमी जेवत असू. नंतर पुन्हा सायकल चालवणे. वाटेत काही बघण्यासारखे ठिकाण असेल तर थांबायचो. लोकं भेटली तर त्यांना 'इंधन वाचवा', 'राष्ट्रीय एकात्मता', 'शांतीचा संदेश' असे संदेश देत असू. त्यांना आमची ओळख करून देत असू. साधारणता: आम्ही ७० ते ८० किमी दिवसाला सायकल चालवत असू. ज्यावेळी सुर्य मावळायचा त्यावेळी एखाद्या गावात मुक्काम करत असू. त्यावेळी कुणी गावकरी आम्हाला भोजन वैगेरे देत असे.

--पाषाणभेद
(TUESDAY, NOVEMBER 3, 2009)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-पाषाणभेद.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.