स्वातंत्र्यसमर १८५७ चा-हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:48:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "स्वातंत्र्यसमर १८५७ चा"
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर"

                        "हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर"--
                       -----------------------------

     स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्‍या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . "शिपायांचे बंड" म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे "हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर" म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .

     केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्‍यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्‍या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . "पुराणातली वांगी पुराणात" तद्वत "इतिहासातली वांगी इतिहासात" असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .

     या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा...

     या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,

"वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!"

      आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..! "जय हिंद"

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(FRIDAY,OCTOBER 1,2010)
-------------------------------

            (साभार आणि सौजन्य-स्वातंत्र्यसमर १८५७ चा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
           --------------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.