झम्प्या झपाटलेला-कविता-मन विरुद्ध मी….सुखांतिका

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:52:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "झम्प्या झपाटलेला"
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "झम्प्या झपाटलेला" या ब्लॉग मधील एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "मन विरुद्ध मी....सुखांतिका"

                              मन विरुद्ध मी....सुखांतिका--
                             ------------------------
   
मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास....
मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज...

असावे एक बटण जे करील मनास पॉज
मिळेल शांती निदान काही तास

यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास
मन करा रे प्रसन्न...सर्व सिद्धीचे कारण
झालो रामदास फ्यान, केला प्लान
मनाची आता जिरवायची छान

झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो
मन कधी मारायचे नाय हाही मंत्र प्राणपणाने जपलो

पण मनाचा आपला उरफाटाच न्याय
ठरविलेलेच साल्याने असा तसा मला सोडायचा नाय

रोज रोज साल्याची एक नवीनच ऑफर
जणू काही तो मालक तर मी नोकर
काय करावे काही कळेना
मनाचा माज जराही उतरेना?

वाचला बुद्ध केले ध्यान
महावीराचे ऐकून घातले उपवास
कृष्णमूर्तींचाही लावला क्लास
पण मनासमोर मात्र सदाच नापास

मनालाही आमचे उद्योग कळले
तेही मनातल्या मनात चांगलेच चरकले
टरकलेल्या मनाने टाकला डाव
म्हणाले मजला
आपल्या दोघांच्या भांडणात कशाला तिसऱ्याचे नुकसान
तिसरा? अबे ये तिसरा कौन?
बावरलो, बावचळलो, गोंधळलो
मनाने टाकला भन्नाट गुगली
तिसरा म्हणून शरीराचा केला शिखंडी

तुझ्या माझ्या भांडणात
शरीराची लागते फुकटची वाट
तुझे ध्यान,  तुझेच उपवास
शरीराला का फुकाचा त्रास?

मनाचे म्हणणे मला होते पटले
तरी मोठ्या हिमतीने त्याला सुनावले
मी आणि शरीर एकच आहोत
तुझ्याविरुद्ध लढण्यास समर्थ आहोत

खदाखदा मन हसले
शरीर आणि तू एकच आहेस?
मग मी काय अनौरस आहे?
वेड्या मीही तुझाच एक भाग आहे
माझ्याशिवाय तुझे अतित्वच शून्य आहे
आणि याचाच तर मजला माज आहे
माझ्यापासून सुटका अशक्य आहे
मरणही माझ्यापुढे व्यर्थ आहे
वेड्या सांगतो एक गुपित माझे
माझ्याशी लढल्याने मीच वाढे
सह वा विरुद्ध मी अजिंक्य आहे
शरणागती हा एकच तुला उपाय आहे

(इथून पुढे मी दोन एन्ड केले आहेत ज्याला जो पटेल त्याने तो गोड मानावा.)

मनाच्या शब्दांनी मी चेकाळलो
शरणागतीच्या ऑफरणे चांगलाच पिसाळलो

मी मनासाठी की मन माझ्यासाठी?
शरीर माझ्यासाठी की मी शरीरासाठी?

सेवकच झालेत मालक आज
माझीच मजला वाटली लाज

अनुभवाने आता समजले होते
मनाशी लढण्यात भयंकर तोटे
मनाला हरविणे अवघड मोठे

शेवटी एकच गोष्ट हातात होती
मनाचे चाळे नुसतेच पहाणे
खेळ त्याचे चालूच ठेवणे
आपण आपले नुसते बघणे

अवघड मोठी ही परीक्षा होती
पण मनास वेसन घालत होती

नुसते पहाता मन बावचळे
पुढचे काही त्यास न कळे
उगाच रेटी स्वत:स् बळेबळे
आणि

क्षणात होई शांत सगळे

बास एवढेच साधे सूत्र होते
नाही लढणे नको ते झगडणे
मनाकडे नुसते लक्ष ठेवणे
लक्ष ठेवता मन पळे
शांतीचा अनुभव आपोआप मिळे

--झम्प्या झपाटलेला
(डिसेंबर 3, 2010)
------------------

                       (साभार आणि सौजन्य-झम्प्या.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.