लेख संग्रह-ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:39:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "लेख संग्रह"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दीपक साळुंके, यांच्या "लेख संग्रह" या ब्लॉग मधील एक संग्रहित  लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन"

                 ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-१--
                ---------------------------------------------

     ग्रामीण महिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. विधायक कामांद्वारे तसेच भूमिगतांना मदत करून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ज्ञात-अज्ञात महिला स्वातंत्र्यसैनिकांचे हे स्मरण..

     १९२१ साली पुणे जिल्ह्यातील मुळशी गावात नीरा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा वीज कंपनी धरण बांधून विजेचा प्रकल्प सुरू करणार होती. या धरणामुळे ५०० चौरस मैलांचे क्षेत्र पाण्याखाली बुडणार होते. त्यात शेतकऱ्यांची उपजाऊ शेतंही पाण्याखाली जाणार होती. १६ एप्रिल १९२१ रोजी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रहाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातला हा पहिलाच मोठा सत्याग्रह. या सत्याग्रहात पहिल्यांदाच स्त्रिया सहभागी झाल्या. या सत्याग्रहात ग्रामीण स्त्री प्रथमच रस्त्यावर उतरली.

     मुळशीच्या सत्याग्रहाला महात्मा गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्यांना हुरूप आला. हा सत्याग्रह १९२४ पर्यंत चालू होता. ग्रामीण स्त्रिया सत्याग्रहाच्या कल्पनेने भारावून गेल्या होत्या. जाईबाई भोई ही एक निरक्षर बाई. बहुसते हे तिचे गाव. तिने ग्रामीण महिलांना सत्याग्रहासाठी संघटित करून धरणविरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. कंपनीच्या संरक्षकांनी जाईबाईला जबरदस्त मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिची अब्रू लुटण्याचाही प्रयत्न केला. एवढे होऊनही जाईबाईने महिलांचा मोर्चा काढला. तिला व तिच्या सहकारी स्त्रियांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सरस्वतीबाई भुस्कुटे हिने तर तान्हे बाळ व म्हातारी सासू यांना घेऊन सत्याग्रह केला. जिथे सुरुंग पेरले होते, त्यावर बसूनच हा सत्याग्रह केला. सर्व सत्याग्रहींना तीन महिन्यांची सक्तमजुरी व पन्नास रुपये दंड व दंड न दिल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा झाली. येरवडा तुरुंगात या सत्याग्रहींचा खूप छळ झाला. पण कुणीही शरणागती पत्करली नाही. भारतात स्त्री-सत्याग्रहींनी अहिंसात्मक मार्गाने दिलेला विसाव्या शतकातील हा पहिलाच लढा. तोही महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांनी दिला, ही विशेष अभिमानाची गोष्ट.

     १९३० मध्ये जंगलचा सत्याग्रह बागलाण- बिळाशी येथे झाले. जेव्हा जेव्हा पोलीस सत्याग्रहींना पकडून नेत, त्या- त्या वेळी स्त्रिया पोलिसांना घेराव घालत. स्त्रियांचा घेराव मोडून काढण्यासाठी पोलीस त्यांच्यावर लाठी चालवीत. चंद्राबाई व तानूबाई बाबर या दोन स्त्रियांनी कराडजवळच्या तांबवे सत्याग्रहाच्या वेळी तर अधिकाऱ्यांची हत्यारेही हिसकावून घेतली. एका रेंजरची बंदूकही त्यांनी काढून घेतली. वनसंरक्षकाच्या लाठय़ाकाठय़ा आपल्या ताब्यात घेतल्या. या त्यांच्या कृत्याबद्दल दोघींनाही सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.

--रोहिणी गवाणकर,सौजन्य–लोकसत्ता
(सप्टेंबर 20, 2009)
---------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-लेख संग्रह.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.