शब्दां वाचून-ध चा मा !!!--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:53:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "शब्दां वाचून"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री श्रीनिवास याडकीकर, यांच्या "शब्दां वाचून" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ध चा मा !!!"

                             ध चा मा !!!--लेख क्रमांक-2--
                            --------------------------

     विसाव्या शतकात साधारण ७० च्या दशकात एका माणसाला 'कर्ण' ह्या एका पात्राने झपाटले होते. हा माणूस कर्णावर लिहिण्याच्या ध्यासाने इतका झपाटला की त्याने कर्णाचे पाय जिथे जिथे लागले तिथे तिथे याने आपली पायधूळ झाडली. अजरा गावी जन्मलेल्या ह्याच माणसाने साकारला एक अजरामर मराठी साहित्याविष्कार- "मृत्युंजय" आणि तो माणूस होता शिवाजी सावंत. एक कादंबरी म्हणून मृत्युंजय हा एक कोहिनूर आहे ह्यात शंका नाही. तत्वज्ञान, वातावरण-निर्मिती; मनाचे,त्यातील भावनांचे चित्रण, शब्दांची सूक्ष्म निवड ह्या साऱ्या गोष्टी "मृत्युंजय"ची वैशिष्ट्ये आहेत. पण असे असले तरी मृत्युंजय ही एका बाबतीत कमी पडते, आणि ते म्हणजे इतिहासाचे चित्रीकरण. माझ्या ह्या वक्तव्याला अनेकांचा आक्षेप असू शकतो आणि तो असा की मुळात ह्या कादंबरीमध्ये ही कर्णाची कादंबरी आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे जी काही वर्णने आहेत ती कर्णाच्या दृष्टीकोनातून आहेत. परंतु, माझा आक्षेप ह्या पुढचा आहे. कादंबरी कर्णाची आहे ही गोष्ट मान्य. अतएव, कर्णाने अलम दुनियेला शिव्या देणे ही गोष्ट सुद्धा मान्य. पण सावंतानी ज्या पद्धतीने ह्या एकंदरीत कादंबरीची मांडणी केली आहे – म्हणजे कुंती, कृष्ण, वृषाली, दुर्योधन ह्यांच्या मनोगतांच्या स्वरुपात- ती मांडणी कर्णाची लेखकाने कल्पिलेली बाजू आणि व्यासांनी मांडलेली बाजू ह्या दोन्ही बाजूंचा उहापोह करण्याचे सामर्थ्य लेखकाला देण्यास सक्षम आहे. पण असे असूनही कित्येक गोष्टी नजरेआड झालेल्या दिसतात. महाभारताच्या वेळी कर्णाने केलेला भीमाचा पराभव जितक्या ओळीत रंगविला आहे तितक्या शब्दात देखील पांडवांच्या दिग्विजयाच्या वेळी भीमाने केलेला कर्णाचा पराभव लेखक मांडत नाहीत. व्यासांनी जे विजय धनुष्य (हे कर्णाच्या धनुष्याचे नाव होते.)भीमाच्या हाती महाभारत युद्धात ४५ वेळा तोडवून घेतले आहे ते लेखकाने अभंग ठेवले आहे. अतएव, भीमाला शिव्या देणे आणि कर्णाची (वस्तुस्थिती जाणून न घेता) स्तुती करणे अशी एक नवी फेशन त्या काळात रुजू झाली. वृकोदर – अर्थात ज्याचे पोट लांडग्यासारखे खपाटी गेले आहे असा (अर्थात सांप्रत भाषेत सिक्स पेक एब्सवाला) – भीम वक्रोदर- अर्थात ढेरपोट्या- म्हणून ओळखला जाऊ लागला. अर्थात हा काही फक्त सावंतांचा दोष नाही. महाभारताच्या ज्या काही शे-पाचशे (मला नक्की आकडा ठावकी नाही) स्थानिक आवृत्या देश-विदेशात निघाल्या त्यात भीम हा "खायला काळ, भुईला भार" अश्या सोडल्यास इतर स्वरुपात दिसत नाही. व्यासांनी रंगवलेल्या वृकोदर, सर्व-शस्त्र-पारंगत, आणि पांडवात सर्वात तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या भीमावर तुंदिलतनु, गदाधारी, रासवट भीमाची छबी अशी काही चिटकली की ती सुधारणे अवघड आहे.

     जी गोष्ट 'मृत्युंजय' ने भीमाच्या बाबतीत साध्य केली तीच गोष्ट 'घाशीराम कोतवाल'ने नाना फडणवीस यांच्या बाबतीत करून दाखवली. नाना हे बाहेरख्याली (किंवा विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आई. ए. एस. इंटरव्हेऊ मध्ये सांगितले तसे- बिहाईन्ड वूमन) प्रतिमेचे होते. पण असे असूनही त्यांनी कधी बेअमली केली ह्याचा पुरावा नाही. प्रस्तुत नाटकावरून, नाना हा केवळ पुण्यातील स्त्रियांचा माग काढीत हिंडणे ह्या एकच कामाचा पगार पेशवे दप्तरातून घेत होता असा अनेकांनी समाज करून घेतला. वास्तविक ज्याच्या न झडणाऱ्या डंक्यांचे आवाज फिरंगी इंग्लंडात बसून ऐकत होते त्याच्या कर्तृत्वाचे इतर पैलू जगासमोर येण्याऐवजी हा एकच पैलू समोर आणला गेला. पुन्हा माध्यम देखील लोकप्रिय. अतएव साहित्याने इतिहासावर मात करणे जरूर होते.

     माझे हे एकंदरीत विवेचन वाचून लोकांची अशी खात्री झाली असेल की मी हे केवळ माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीना धक्का लागला म्हणून आहे. परंतु माझा हेतू वेगळाच आहे. भारताच्या ज्या ज्या वेळी चुकीचे आदर्श समोर आणले गेले, आणि एकंदरीत इतिहासाची प्रतारणा झाली, त्या त्या वेळी देश संकटात सापडला. घोरीला सोडते वेळी पृथ्विराजाने युधिष्ठिराचा आदर्श बाळगला आणि नागवला गेला. ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन करतेवेळी आधी इथल्या लोकांचा बुद्धिभेद केला. त्यासाठी इथल्या इतिहासाचे विचीत्रीकरण करण्यात आले. ऐतिहासिक व्यक्ती, घटना ह्यांचा चुकीचा अन्वयार्थ लावण्यासाठी लोकांना प्रेरित केले गेले. आता देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, किंबहुना आपण माप ओलांडले आहे. जगाला एक खेडे म्हणताना आपण खेड्यात घरकुल उभारले आहे, धर्मशाळा नाही,अतएव ओळख जपणे ह्या खेरीज इतर पर्याय नाही ही गोष्ट ध्यानी, मनी, स्वप्नी असू द्यावी. आणि ह्यासाठी विचारांनी -मग ते आपल्या राष्ट्रीय वीरांचे समर्थक का असेना – इतिहासावर प्रभाव पडू ना देणे हे'च' इष्ट आहे. कारण मूळ आणि शुद्ध स्वरूपातील इतिहास हाच भावी पिढ्यांना प्रेरक, मार्गदर्शक आणि उद्बोधक ठरतो.

     अश्या अनेक चुका आहेत, त्यांचा समाचार पुन्हा केंव्हातरी !
इति लेखनसीमा. मर्यादेयं विराजते.

--श्रीनिवास.
(मे 16, 2010)
---------------

                     (साभार आणि सौजन्य-शब्दांवाचून.वर्डप्रेस.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.